कोल्हापूर : महान्यूज लाईव्ह
गुन्हेगार गुन्हेगारच असतो.. असं म्हणतात की, पोलिसांना गुन्हेगार त्याच्या चेहऱ्यावरूनच कळतो.. पण अलीकडे पोलीस तरी तेवढे चाणाक्ष राहिलेत का? आम्ही असं का म्हणतोय? तर तुम्हीच बघा.. कोल्हापूर जिल्ह्यातील या घटनेने पोलिसांची अब्रू वेशीला टांगली गेली आहे.. कारण नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या एकाला पोलिसांनी पकडले..जुगार खेळण्यासाठी त्याला पैसे हवे होते म्हणून या पकडलेल्या गुन्हेगारानेच पोलीस कोठडीत असताना पोलिसांना गंडवले. तुमची बदली करून दाखवतो असे म्हणत तब्बल 14 लाख रुपये उकळले..!
डिसेंबर 2023 ते एप्रिल 2024 च्या दरम्यान जुगारासाठी पैसे गोळा करण्याच्या नादात मनोज सबनीस याने सहा पोलिसांकडून तब्बल 13 लाख 60 हजार रुपये घेतल्याची माहिती उघडकीस आली आहे. एका पोलिस अमलदाराची बदली करण्याचे आमिष सबनिसने पोलीस कोठडीत दाखवले आणि त्यानंतर त्या अंमलदारासह सहा जण त्याच्या जाळ्यात अडकले.
सांगलीवाडीतील एकाच्या खात्यावर ऑनलाईन बँकिंगद्वारे हे पैसे जमा करण्यात आल्याने सारा भांडाफोड झाला. कारण सांगलीवाडीत ज्याच्या खात्यावरील पैसे जमा झाले, तो ऑनलाइन जुगार चालवतो. त्यामुळे पोलिसांनी या ऑनलाइन जुगार चालवणाऱ्यालाही अटक केली.
सबनीस ला पोलिसांनी अटक केली होती. नोकरीचे आमिष दाखवून त्याने फसवणूक केली होती. त्यामुळे त्याला अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत असताना त्याने आपले कुठपर्यंत संबंध आहेत याविषयी पोलिसांना सांगत जाळ्यात अडकवले. पोलिसांची बदली करतो म्हणत त्याने तब्बल 13 लाख 60 हजार रुपये घेतले आणि सांगलीवाडीतील ऑनलाइन जुगार चालकाकडे पाठवले.











