ओझर्डे येथील प्रगतिशील शेतकरी राकेश फरांदे यांचा मृत्यू!
दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : ओझर्डे (ता. वाई) येथील प्रगतिशील शेतकरी राकेश अरविंद फरांदे वय (29) या तरुण शेतकऱ्याच्या अंगावर पावर ट्रिलर पडून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या अनपेक्षित घटनेने ओझर्डे गावावर शोककळा पसरली. त्यांच्या या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की राकेश फरांदे हे मालदरावस्ती शेजारी असणाऱ्या शेतात आपल्या मालकीचा पावरट्रिलर ट्रॅक्टर घेऊन शेतीचे काम करण्यासाठी गेले होते. पण काम करत असतानाच चालू अवस्थेत पावर ट्रिलर अचानक पलटी झाला व त्याखाली राकेश फरांदे हे सापडल्याने ते गंभीर जखमी झाले.
त्यांना तातडीने वाईच्या खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तरुण प्रगतशील शेतकऱ्याच्या या अपघाती मृत्यूने सर्वांना धक्का बसला. शेकडो जणांनी यावेळी गर्दी केली. ओझर्डे गावासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात होती. फरांदे यांच्यावर श़ोकाकुल वातावरणात ओझर्डे येथील कृष्णानदी काठावर असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.











