दुबई साखर परिषदेत भारताच्या भूमिकेबद्दल सर्वांना उत्सुकता.
डॉ. संदेश शहा, इंदापूर.
भारतात साखरेचे उत्पादन वाढणार असून देशात पुढच्या वर्षी इथेनॉलचे उत्पादन देखील वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी सन २०२५-२६ वर्षामध्ये साखर निर्यात करावी लागणार आहे. जगातील साखर व इथेनॉल उत्पादनाचा अभ्यास करता भारताचा साखर व इथेनॉल उत्पादनात जगामध्ये दबदबा कायम राहणार आहे, असे मत भारताच्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
दुबई साखर परिषद २०२५ ही ७२ देशातील ७०० प्रतिनिधींच्या उपस्थितीत सध्या सुरू आहे. या साखर परिषदेत बुधवारी ‘आम्ही भारतासाठी पुढे काय पाहतो?’ या विषयावरील चर्चासत्र संपन्न झाले. या चर्चासत्रात भारताच्या भूमिकेबद्दल दुबईच्या साखर परिषदेत खूप उत्सुकता दिसून आली. या चर्चासत्राच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांनी भारत सरकारची बाजू भक्कमपणे मांडली.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, चालू सन २०२४-२५ मध्ये भारताने १० लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली असून जागतिक साखर बाजारामध्ये भारताच्या साखरेची गुणवत्ता चांगली आहे. त्यामुळे भारताच्या साखरेला जगात मोठी मागणी आहे. भारताने आणखी साखरेची निर्यात करावी, असा सूर या साखर परिषदेतून व्यक्त केला जात आहे. भारत देशामध्ये साखर ही अत्यावश्यक सेवेमध्ये येत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी, ग्राहक व कारखानदार या सर्वांचा समन्वय ठेवून भारत सरकारला धोरणे आखावी लागतात. केंद्र सरकार व राज्य सरकारे ही देशातील साखर उद्योगाच्या पाठीशी ठामपणे आहेत, त्यामुळे भारतात गेल्या ८ वर्षां मध्ये इथेनॉलमध्ये झालेली वाढ ही जगात इतरत्र कोणत्याही देशामध्ये झालेली नाही.
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज ही भारत देशातील साखर कारखानदारीची फेडरल बॉडी असून, देशातील साखर कारखानदारी, शेतकरी यांना एकत्रित मदत, तांत्रिक सल्ला देण्याचे काम प्रभावीपणे करत आहे. केंद्र सरकारला साखर उद्योगा संदर्भात धोरणे ठरवावी लागतात, सदरची धोरणे ठरविण्यामध्ये राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची महत्त्वाची भूमिका राहिली असल्याचे सूतोवाच यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले.
या चर्चासत्रामध्ये अनुप कुमार (व्यवस्थापकीय संचालक सक्डेन इंडिया), निरज शिरगावकर (अध्यक्ष, इंडियन शुगर अँड बायो- एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ), रवी गुप्ता ( संचालक श्री रेणुका शुगर ), दीपक बल्लानी (महासंचालक, इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ), संदीप कदम (अध्यक्ष, एक्झिम समिती, ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन), अश्विनी श्रीवास्तव ( सहसचिव, साखर, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग,भारत सरकार ) यांनी सहभाग घेतला.
दुबई जागतिक साखर परिषदेमध्ये राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी भारत सरकारची साखर उद्योगासंदर्भातील बाजू मांडली. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे भारतातील साखर उद्योग हा जगामध्ये पुढे जात आहे, तसेच इथेनॉल उत्पादनात भारत देश जगामध्ये अग्रेसर आहे, असे या चर्चासत्रामध्ये बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.











