अमेरिकेने अमेरिकेमध्ये बेकायदा स्थलांतरित झालेल्या व राहत असलेल्या 205 भारतीयांना काल अमृतसरला आणून सोडले. त्यांच्या हातात आणि पायातही बेड्या होत्या असे सांगितले जात असून, यावरून बरीच चर्चा सुरू आहे. दरम्यान कोलंबिया देशाचा धडा भारताने का घेतला नाही? असा सवालही विचारला जात असतानाच अमेरिकेने नागरी विमानांपेक्षा लष्करी विमानेच का वापरली? याचे उत्तर किंवा कारण लक्षात घेतले तर आपला आपल्यालाच राग येईल..
अमेरिकेचा भारतापर्यंतचा अमेरिकन एअरलाइन्स मधून प्रवास करणारा प्रवाशाचा खर्च 900 डॉलर पर्यंत येतो मात्र अमेरिकेने 4675 डॉलर पर्यंत खर्च येत असूनही लष्करी विमानेच वापरली. ही लष्करी विमाने अमेरिकेने का वापरली यावरून सध्या बरेच रणकंदन सुरू असून त्याचा अर्थ लक्षात घेतला तर भारतासाठी ही बाब किती लाजिरवाणी आहे हे लक्षात येईल.
दुसऱ्यांदा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांनी बेकायदा अमेरिकेत राहणाऱ्या लोकांसाठी एलियन आणि गुन्हेगार असा शब्दप्रयोग केला होता. त्याचा विचार करता अमेरिकेमध्ये बेकायदेशीर रित्या स्थलांतरित झालेल्यांना गुन्हेगारासारखेच पाठवले गेले पाहिजे असा ट्रम्प यांचा निग्रह होता आणि लष्करी विमान वापरण्यामागील हेतू तोच आहे आणि आम्ही म्हणजे अमेरिका बेकायदास स्थलांतरितांबाबत किती कडक आहोत हेच त्यांना दाखवायचे होते.
अमेरिकेच्या खासदारांशी बोलताना ट्रम्प यांनी देखील हे सांगितले होते की, इतिहासात पहिल्यांदाच आम्ही अशा स्थलांतरित लोकांना लष्करी विमानामध्ये भरून पाठवत आहोत. हे लोक अनेक वर्ष आम्हाला मूर्ख समजत होते. या कारवाईमुळे अमेरिका एक मजबूत संदेश देण्याचा प्रयत्न करत असून असे स्थलांतरित पुन्हा आमचा आदर करतील. अमेरिकेत येण्यासाठी हजार वेळा विचार करतील. स्थलांतरितांना बेड्या ठोकून लष्करी विमानातून परत पाठवले जाण्याची ही घटना सामान्य नाही. भारत ती कोणत्या पद्धतीने हाताळतो याकडेच यापुढील काळातील राजकीय धुरिणांचे लक्ष राहील.











