जळगाव : महान्यूज लाईव्ह
जळगाव जिल्ह्यातील जळोद गावची घटना. देवाघरी गेलेल्या व्यक्तीच्या अकराव्या दिवसाच्या विधीसाठी अमोल शुक्ल या पुजाऱ्याने होम पेटवला आणि नदीकाठी पेटवलेला होम त्यांच्यासाठी जीवघेणा ठरला. रक्तदाब आणि मधुमेहाचा आजार असलेल्या अमोल शुक्ल यांचा झालेला मृत्यू चटका लावून गेला.
जळोद गावातील या घटनेत मधमाशांमुळे पुजाऱ्याचा मृत्यू झाला. मयत व्यक्तीच्या अकराव्या दिवसाच्या विधीसाठी अमोल शुक्ल हे पुरोहित करणारे पुजारी गेले होते. नदीच्या काठावर पूजेला सुरुवात झाली आणि त्यांनी होम पेटवला. त्या होमातून निघालेला धूर परिसरात वाढला. नदीकाठी असणाऱ्या एका पुलापर्यंत हा धूर पोहोचला.
पुलाच्या खाली मधमाशांचे मोठे पोळे होते. यामध्ये आगी मोहोळाच्या मधमाश्या होत्या. धूर तिथे पोहोचला आणि मधमाशा चवताळल्या. या मधमाशा प्रचंड वेगाने आणि मोठ्या संख्येने जिथून धूर सुरू झाला होता तिथपर्यंत पोहोचल्या आणि त्यांनी लोकांना चावे घेण्यास सुरुवात केली. लोकांनी आपला बचाव केला, परंतु अमोल शुक्ल यांना मात्र मोठ्या संख्येने मधमाशा चावल्या. तोंडालाच मधमाशा चावल्याने व रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास अगोदरच असल्याने शुक्ल यांना त्रास सुरू झाला.
त्यांना अमळनेर येथे उपचारासाठी तातडीने नेण्यात आले. मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच श्वास घेण्यास त्रास झालेल्या अमोल शुक्ल यांचा श्वास वाटेतच बंद झाला. अमोल शुक्ल यांच्या निधनाने या संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. या घटनेमध्ये इतरही सहा ते सात जणांना मधमाशा चावल्या.











