बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील सार्वजनिक विहिरींच्या कामांमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विकास कामांमध्ये टक्केवारी घेऊन मलिदा खाणारी गॅंग आज उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांनी स्वतःच रडारवर आणली. पवारांच्या बारामतीत लाच मागणारी पवारांची भावकी कोण? असाच प्रश्न या निमित्ताने समोर आला, जेव्हा अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्याचे नाव घेत सांगितले, आमची भावकी..पण त्याने पैसे खाल्ले असतील, तर त्याचं काही खरं नाही!
आज उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना होळ परिसरातील दीपक वाघ यांनी एक निवेदन दिले. यामध्ये अजित पवार यांनी मंजूर केलेली दहा लाखाच्या रकमेच्यावरची जी विकास कामे आहेत, त्यासाठी अधिकारी आणि सरपंच हे टक्केवारी घेऊन कामे मॅनेज करत असल्याची तक्रार केली होती. त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व विहिरींच्या योजनेच्या कामात सुजय पवार नावाचे अधिकारी टक्केवारी घेत मलिदा खात असल्याची तक्रार करण्यात आली होती.
याचा संदर्भ घेत अजित पवार यांनी युनियन बँकेच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी याचा उल्लेख केला. अधिकारी सुजय पवार यांचे नाव घेत ते म्हणाले, कोणतरी आमची भावकी आहे आणि ते विहिरी मागे 75 हजार रुपयांचे कमिशन खात असल्याचे तक्रार माझ्याकडे आली आहे. जर त्यांनी पैसे खाल्ले असतील तर त्यांचं काही खरं नाही. जर त्यांनी पैसे घेतले नसतील व त्यांना कामासाठी शुभेच्छा! असं म्हणत मी दोन्ही बाजू ऐकून यावर माहिती घेणार आहे असे अजित पवार म्हणाले.
दीपक वाघ यांनी अजित पवारांकडे नवीन तक्रार केली असून यामध्ये जी कामे दहा लाखाच्या वरची आहेत, ती निविदा मुदत संपल्यानंतर खुली केली जात आहेत. उघडली जात आहेत. त्याचबरोबर सरपंच व अधिकारी वेगवेगळ्या प्रकारच्या टक्केवारी घेऊन ही कामे मॅनेज करत आहेत. अशा प्रकारची तक्रार केली होती. यामध्ये देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी पवार म्हणून आहेत असा उल्लेख त्यांनी केला आहे. साहजिकच आज दिवसभरात बारामतीत अजित पवार यांनी केलेल्या उल्लेखामुळे या अधिकाऱ्याच्या नावाची चर्चा झाली.











