किरण माने हे मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते असून ते सातत्याने सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. उत्तर प्रदेशातील प्रयागराज मध्ये सध्या सुरू असलेल्या कुंभमेळ्यातील सध्याच्या घटनांवर आधारित त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली. यामध्ये त्यांनी संत तुकोबारायांच्या अभंगाचा उल्लेख करत ही सर्व नाटके आहेत अशी स्पष्ट टीका केली आहे. त्यांनी केलेली ही पोस्ट सध्या व्हायरल होत असून त्यात नेमकं काय नमूद केलं आहे ते आपण पाहूयात त्यांचा हा लेख जसाच्या तसा..
महाकुंभमेळ्यात परवा एक महाबदमाश, महाकारस्थानी माणूस गंगेत डुबक्या मारत देवदेव केल्याची महानाटकं करताना बघितला. लै हसलो भावांनो ! मनात आलं… आज तुकोबाराया असता तर? असले भंपक दिसले की तुकोबाराया शाब्दीक आसूडच काढायचा… लै फोडायचा. म्हणायचा :
जाउनियां तीर्था काय तुवां केलें । चर्म प्रक्षाळिलें वरी वरी ।। अंतरींचे शुद्ध कासयानें जालें । भूषण त्वां केलें आपणया ।। इंद्रावण फळ घोळिलें साकरा । भीतरील थारा मोडे चि ना ।। तुका म्हणे नाहीं शांती क्षमा दया । तोंवरी कासया स्फुंदां तुम्ही ।।
…तीर्थक्षेत्राला जाऊन तू काय केलंस? वरवरचं चामडं धुतलंस. …तुझं अंत:करण शुद्ध झालंच नाही, ते तसंच गढूळ, अस्वच्छ राहिलंय. मग ‘मी तीर्थयात्रा केली’ म्हणून काय मोठं भूषण मिरवतोस? …इंद्रावण नांवाचं एक अतिशय कडू फळ आहे, ते साखरेत घोळलं म्हणून त्याचा आतला कडूपणा जाईल का ? …शेवटी तुका म्हणे : तुमच्या मनात दया, क्षमा, शांतीच नाही, तर का उगीच खोटे मायेचे उमाळे आणून रडत आहात?
तुकोबाच्या काळातले वर्चस्ववादी वेगळे नव्हते. ते हल्लीच्या बाजारबुणग्यांचेच बापजादे ! ते बी अशी नाटकं करण्यात लै माहीर. ‘मी चारधाम करून आलोय. मी नर्मदा परीक्रमा केलीय. मी गंगेत स्नान केलंय. मी हिमालयात तप करून आलोय. मी ह्यॅव केलंय आन् त्यॅव केलंय..’ तात्पर्य हे की, “मी ‘पावन-पवित्र’ झालोय. आता सो कॉल्ड धर्माचा ठेका मला द्या.” ! मग तुकोबाराया शब्दांचा जोडाच काढायचा ! अरे हे सगळं करूनही तुझ्या मनातली विषमता गेलीय का?? तुझ्यात मानवतेच्या ओलाव्याचा एक थेंब तरी आलाय का??? गंगेत डुबक्या मारूनबी तुला माणसाचाच विटाळ वाटत असेल तर थू तुझ्या तीर्थाटनावर.
आज चारशे वर्षांनंतरही हेच हातखंडे सुरू आहेत. ही फेकाडी, मतलबी, कपटी मेंटॅलिटीची राजकारणी लोकं माणसामाणसात नफरत पसरवतात. दंगली घडवून आणतात. माणसांच्या निर्घृण कत्तली करणाऱ्या आकांना अभय देतात. बलात्काऱ्यांना पक्षात घेऊन उच्चपदं देतात. कुणाला आयुष्यातनं उठवणं, घात करणं हा तर यांचा धंदाच.
…पण असे धार्मिक मेळेफिळे आले की लोकांना गंडवण्यासाठी, ‘आपण लै भाविक,धार्मिक आहोत’ असा ‘ऑन कॅमेरा शो’ सुरू होतो. तिर्थयात्रा कर, त्याचे फोटो व्हारल कर. काश्मीरपास्नं कन्याकुमारीपर्यन्त ज्या देवळात जाईल तिथले टिळे लावून, टोप्या घालून, ड्रेस घालून आरत्या कर… त्याचे व्हिडीओ व्हायरल कर.. कुठं गुहेत ध्यानाला जा, तर गंगेत डुबकी मार. सगळीकडं कॅमेरा असतो सोबत. गुहेतबी. हेतू हाच की, ‘आता धर्माचा ठेकेदार मी !’
…अशा नाटकी लोकांना आपण भुलतो कारण आपण तुकोबाराया वाचलेला नसतो ! तुकोबाच्या विचारांची व्यक्ती कधीच असल्या लबाडांच्या जाळ्यात फसणार नाही. बाकीच्या येडपाट बथ्थडांना हे कितीही बोंबलुन सांगीतलं तरी पटणार नाही. त्यांना हेच भुरटे खरे वाटतात. अशांच्या वाट्याला नंतर फक्त पश्चात्ताप येतो. बरबाद होतात ते अंधभक्तीमुळं. अशांसाठी तुकोबाराया म्हणून गेलाय, “किती सांगू तरी नाईकती बोडकीचे । शेवटी सिंदळीचे रडतील ।।” बघा भावांनो.. विचार करा.. वारकरी संप्रदायानं सांगितलेला मानवतेचा धर्मच खरा. बाकी सब झूठ. वेळीच सावध व्हा !











