बारामती : महान्यूज लाईव्ह
राज्यातील मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यातील मराठा समाजात संतापाची भावना आहे. आज बारामतीत सहयोग सोसायटीतील अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर मराठा क्रांती मोर्चाने अजितदादांच्या बंगल्यासमोर ढोल बजाओ आंदोलन केले.
आज सकाळी पु.ना. गाडगीळ चौकापासून ढोल वाजवत मराठा आंदोलकांनी मोर्चा काढला. हा मोर्चा भिगवण रस्त्याने सहयोग सोसायटीपर्यंत पोचला. या मोर्चातील मोर्चेकऱ्यांनी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, आमच्या नोकऱ्यांचं काय अशा आशयाचे फलक हातात घेतले होते. तेथे सहयोग सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर हा मोर्चा अडविण्यात आल्यानंतर तेथे कार्यकर्त्यांनी ढोल वाजवून सरकारकडे या आरक्षणासंदर्भात तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले.
आरक्षण मागणीसाठी केलेल्या ढोल बजाओ आंदोलनाचा व्हिडीओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्हच्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदन देण्यात आले. या निवेदनानुसार सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे तात्काळ अर्ज करून पाच किंवा अधिक न्यायमूर्तींच्या घटनापीठाची विनंती करावी व त्या घटनापीठासमोर आरक्षणाला जी स्थगिती दिली आहे, त्या स्थगितीला तात्काळ मागे घेण्यासाठी प्रभावी बाजू मांडून पाठपुरावा करावा सर्वोेच्च न्यायालय जोपर्यंत स्थगिती आदेश उठवत नाही, तोपर्यंत सरकारने कोणत्याही प्रकारची शासकीय भरती करू नये. सर्वोच्च न्यायालयाने ज्या दिवशी स्थगिती दिली, तोपर्यंत ज्यांची भरती केलेली आहे, त्यांना सर्वांना शासकीय सेवेत तात्काळ सामावून घ्यावे व शैक्षणिक प्रवेशही दिले जावेत. सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू होईल, तेव्हा सरकारी पक्षातील प्रतिनिधी, विरोधी पक्षांचे प्रतिनिधी यांनी एकत्रित सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहून सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाची बाजू मांडणाऱ्या वकीलांना माहिती द्यावी, यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. आपल्या अधिकारात असलेल्या सारथी या संस्थेची आर्थिक तरतूद व मनुष्यबळ वाढवावे अशी मागणी करण्यात आली आहे.











