पुणे : महान्यूज लाईव्ह
1994 मध्ये बांधकाम व्यवसायिकांनी घेतलेली जमीन पुण्यातील दुसऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाने परस्पर बनावट दस्तऐवज करून हस्तांतरित केली, खरेदी केली. याद्वारे शासनाची फसवणूक केल्यावरून चतुशृंगी पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यवसाय कंपनीचा देखील समावेश आहे.
पोलिसांनी कीर्ती डेव्हलपर्स व कन्स्ट्रक्शन कंपनीतील मॅनेजर जयवंत ज्ञानदेव साळुंखे यांच्या फिर्यादीवरून अग्रवाल डेव्हलपर्सच्या व्यावसायिकासह १० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात खळबळ माजवणाऱ्या या घटनेची सुरुवात 13 जानेवारी 2023 ते 2 ऑगस्ट 2024 या दरम्यान झाली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कीर्ती डेव्हलपर्स या कंपनीचे मालक सी.पी. मोहनदास यांचा बाणेरमध्ये सहा गुंठे मोकळ्या जमिनीचा प्लॉट आहे. ही जमीन त्यांची बहीण रत्नाबाई टी राधाकृष्णन यांनी मूळ मालक सोपान गणपती मुरकुटे यांच्याकडून सन 1994 मध्ये खरेदी केली.
मात्र बाणेर येथील तलाठी कार्यालयातून सप्टेंबर 2024 मध्ये उतारा काढला असता सातबारा उताऱ्यावर देन्स इन्फ्रास्ट्रक्चर एलएलपी तर्फे अमर नामदेव शिंदे या नावाची नोंद कब्जेदार सदरी झाली होती व पूर्वीचे मालक रत्नाबाई राधाकृष्णन यांच्या नावापुढे कंस झाल्याचे दिसून आले. त्यामुळे किर्ती डेव्हलपर्स कंपनीने याची माहिती घेतली व त्याचे दस्त काढून घेतले. तेव्हा एक कोटी 75 लाख रुपयांना ही जमीन अमर शिंदे या नावाने खरेदी झाल्याचे दिसून आले.
मात्र या खरेदी खताची नक्कल काढल्यानंतर हवेलीच्या दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कुलमुखत्यारधारक उभे करून या प्लॉटची परस्पर खरेदीखत झाल्याचे दिसून आले. यामध्ये शासनाची देखील फसवणूक करण्यात आल्याचे दिसून आल्याने साळुंखे यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली त्यावरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. चतुशृंगी पोलीस पुढील तपास करत आहेत.











