पुणे : महान्यूज लाईव्ह
जेजूरीत बसस्थानकाजवळ महामार्ग ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग तसेच येथून पुढे काही अंतरावर तीव्र उतार असल्याने मुख्य चौकापर्यंत रम्बलिंग स्ट्रिप्स बसवण्यात याव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्राकडे केली आहे. केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना याबाबत त्यांनी पत्र दिले असून लवकरात लवकर यावर सकारात्मक विचार व्हावा, असे म्हटले आहे.
जेजुरी एसटी बसस्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात नागरीक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वर्दळ असते. त्यांना महामार्ग ओलांडून पलीकडे जावे लागते. या मार्गावरून वेगाने वाहने जात येत असतात. त्यामुळे येथे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याची गरज आहे. या उपाययोजना केल्यास येथील अपघात होण्याचे प्रमाण कमी होऊन हा परिसर नागरीकांसाठी सुरक्षित होईल, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले आहे.
याबरोबरच जेजुरी बसस्थानकापासून शहराच्या हद्दीत जाणाऱ्या रस्त्यावर तीव्र उतार आहे. या ठिकाणाहून वाहने वेगाने येत-जात असतात. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोरगाव चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच उतार असलेल्या अन्य भागात आवश्यक त्या ठिकाणी तातडीने रम्बलिंग स्ट्रिप्स बसवण्यात याव्यात. याबरोबरच सासवड ते जेजुरी दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर दिशादर्शक फलक आणि रिफ्लेकटर बसविण्यात यावेत, असेही सुळे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
पाटस ते बारामती संपूर्ण मार्गावर स्ट्रीट लाईट बसवा
संत श्री तुकाराम महाराज पालखी महामार्गावर पाटस ते बारामती या मार्गावर गावांच्या परिसरात स्ट्रीट-लाईट बसविल्या आहेत. परंतु तशा इतर ठिकाणी नाहीत. शिवाय या मार्गावर रिफ्लेक्टर नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालविताना प्रवाशांना त्रास होत आहे. येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. हे पाहता पाटस ते बारामती संपूर्ण मार्गावर स्ट्रीट लाईट तसेच रिफलेक्टर बसवावेत. याखेरीज येथे अपघात होऊ नयेत यासाठी आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात, अशी मागणीही सुळे यांनी केली आहे.











