पुणे : महान्यूज लाईव्ह
पिंपरी शहरातील वाल्हेकर वाडी परिसरात एका हाऊसिंग सोसायटी 13 जानेवारी रोजी घरफोडी झाली या घरपुडीमध्ये पैसे चोरीला गेले चिंचवड पोलिसांनी याची फिर्याद दाखल करून घेतली आणि जेव्हा तपास केला तेव्हा पोलिसांना देखील धक्का बसला.. चोर दुसरा तिसरा कोणी नव्हता तर त्या घरातील कर्त्या पुरुषाचा मेव्हणा आणि त्याच्या पत्नीचा भाऊच होता.
पोलिसांनी या घटनेत मूळच्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कुंभेजळगाव येथील श्रीकांत दशरथ पांगरे या 29 वर्षीय युवकाला अटक केली. पोलीस श्रीकांत पर्यंत पोहोचले ही फार मोठी कामगिरी होती. चोरीचा एकूण उद्देश लक्षात घेता व चोरी करण्याचा प्रकार लक्षात घेता पोलिसांना एक संशय आला की ही चोरी होण्यामध्ये घरातील किंवा घरातील माहीत असलेल्या लोकांपैकीच कोणाचा तरी हात असला पाहिजे.
त्यावरून पोलिसांनी कुटुंबीयांकडे चौकशीला सुरुवात केली. तेव्हा ज्या महिलेने फिर्याद दिली होती, तिचा भाऊ गेल्या चार महिन्यापासून त्यांच्याकडे राहण्यास आला असून तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाली. मग पोलिसांनी या श्रीकांतची माहिती घेण्यास सुरुवात केली. तेव्हा पोलिसांना श्रीकांतला ऑनलाइन रमी खेळण्याची सवय असल्याचे लक्षात आले.
पोलिसांनी अधिक चौकशी केली, तेव्हा श्रीकांत याने या ऑनलाइन जुगारामध्ये गावाकडील पाच एकर शेती विकल्याचे पोलिसांना लक्षात आले आणि पोलिसांचा संशय बळावला. मग पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि जेव्हा खाक्या दाखवला. तेव्हा त्याने लोकांचे उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी बहिणीच्या घरात चोरी केल्याचे कबूल केले.











