घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याच्या प्रवचखेडा या परिसरातील. कापूस वेचणी करणाऱ्या मजुराच्या एका चिमुकल्या मुलावर बिबट्याने अचानक झडप घातली आणि त्याला जवळपास दीडशे ते दोनशे फूट आत शेतात फरपटत नेले. तेथे उभ्या असलेल्या ट्रॅक्टरचालकाने लगेच ट्रॅक्टर शेतात घातला. आवाजाने बिबट्या पसार झाला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. जखम वर्मी लागल्याने मुलाचा मृत्यू झाला होता.
वैजापूर तालुक्यातील प्रवचखेडा परिसरात पूरक काशिनाथ चव्हाण यांच्या शेतातील कापूस वेचणी सुरू होती. कापूस वेचणीसाठी मध्य प्रदेशातून काही मजूर येथे आले आहेत. ते मजूर कापूस वेचत असताना एका कुटुंबातील चिमुकला मुलगा झाडाखाली खेळत होता. त्याला एकट्यालाच पाहून डबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली.
या चिमुकलेला जबड्यात पकडून बिबट्या शेतात घुसला. ज्वारीच्या शेतात चिमुकल्या मुलाला बिबट्या घेऊन जात असल्याचे पाहताच या चिमुकल्याच्या मोठ्या भावाने जोरात हाक मारली. शेजारीच रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर चालकाने हे दृश्य पाहिले आणि थेट शेतात ट्रॅक्टर घातला. ट्रॅक्टरच्या आवाजाने बिबट्याने मुलाला सोडले आणि पळ काढला.
मात्र या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला. वैजापूर तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. यापूर्वीही बिबट्याने वैजापूर तालुक्यात असाच हल्ला केला होता. या परिसरात बिबट्या जास्त संख्येने वाढू लागल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. सध्या कापूस वेचणीचे दिवस असल्याने मजूर शेतात आहेत, मात्र बिबट्याच्या भीतीने सगळेच चिंतेत आहेत.











