डॉ. संदेश शहा, इंदापूर
ज्यावेळी एचआयव्ही म्हणजे समाजातील वाळीत टाकण्याचा प्रकार असायचा, तसेच देहविक्रय करणाऱ्या महिला म्हणजे समाजाशी कोणताच संबंध नसलेल्या त्यांच्याशी कोणताच संबंध न ठेवता येणाऱ्या घटकातील एक घटक ठरल्या, अशा महिलांसाठी पुण्यातील एका अवलियाने 44 वर्षांपूर्वी माणुसकीचा पाया घातला आणि याच पायावर गेली 44 वर्षे हा माणूस माणुसकीचा नवा धागा माणुसकीची नवी मोळी बांधतोय. नाव आहे डॉ. राजेंद्र वसंत भवाळकर!
पुण्यातील विसावा सोशल फाउंडेशन व हिरकणी महिला विकास संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेंद्र वसंत भवाळकर यांना राष्ट्रीय समाज परिवर्तक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेली 44 वर्ष भवाळकर हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. राष्ट्रीय युवा सामाजिक संमेलन २०२५ अंतर्गत राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून पुणे पत्रकार भवनमध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले.
डॉ. राजेंद्र भवाळकर हे गेल्या सुमारे ४४ वर्षा पासून विधवा विवाह, जेष्ठ नागरिकांचे विवाह, दिव्यांग व्यक्तींचे विवाह, देहविक्रय करणाऱ्या महिलांचे विवाह, एचआयव्ही बाधित असलेल्या वधू वरांचे विवाह जमावण्याचे काम सामाजिक बांधिलकी केंद्रबिंदू मानून निरंतरपणे करत आहेत. त्याचबरोबर आंतरजातीय व अंतरधर्मीय विवाह यशस्वीपणे लावून देवून सामाजिक सलोखा निर्माण करत आहेत.
राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्मसमभाव केंद्र बिंदू मानून देत असलेल्या सामाजिक योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास अभिनेता ध्रुव दातार, शर्मिला नलावडे, देवानंद कांबळे, स्वाती तरडे, निना ऊबाळे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. भवाळकर यांनी या सन्मानामुळे माझ्या सामाजिक जबाबदारीत मोठी वाढ झाली आहे. माझे सामाजिक काम पाहून संयोजकांनी मला हा पुरस्कार दिल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.











