ज्ञानेश्वर रायते, बारामती
बारामती तालुक्यातील लोणीभापकर गावातील पाच शेतकऱ्यांचे वीजपंप चोरीला गेले आहेत. विशेष म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर पासून अगदी नियमित प्रत्येक महिन्याला एक अशाच पध्दतीने फक्त शेतकऱ्यांचेच वीजपंप चोरीला जात आहेत. त्यामुळे जशी निकड लागेल, तसे एक एक वीजपंप चोर चोरतो की काय अशीच शंका निर्माण झाली आहे, मा्तर यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, दरम्यान या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी पाच स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
लोणीभापकर येथील जयसिंग विठ्ठल भापकर यांची गट क्रमांक ४५६ मधील विहीरीवरील १८ हजार रुपये किंमतीची ५ अश्वशक्तीची शिवम कंपनीची पाणबुडी व १५ हजार रुपये किंमतीची ३ अश्वशक्तीची शिवम कंपनीची पाणबुडी वीजमोटार ३ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर २०२४ या दोन दिवसाच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेली. तर सुनिल संपत बारवकर (वय 38 वर्ष, व्यवसाय शेती) यांच्या शेतातील जमीन गट क्रमांक ६२९ मधील १६ हजार रुपये किंमतीची रोटक कंपनीची ५ अश्वशक्ती क्षमतेची पाणबुडी इलेक्ट्रीक मोटार अज्ञात चोरट्यांनी २८ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर या दरम्यान चोरून नेली.
यानंतर २८ डिसेंबर २०२४ रोजी लोणीभापकर मध्येच चोरीची घटना घडली. यामध्ये गावातील ४७ वर्षीय दत्तात्रेय जयवंत भापकर यांची लोणीभापकर येथील गट क्रमांक १०६३ मधील विहीरीवर असलेली लक्ष्मी कंपनीची ५ अश्वशक्ती क्षमतेचा ११ हजार रुपये किंमतीचा पाण्यातील पाणबुडी वीजपंप अज्ञात चोरट्याने चोरून नेला व पाईप आणि केबलची तोडफोड केली.
यापूर्वी १७ सप्टेंबर २०२४ ते १८ सप्टेंबर २०२४ दरम्यान अशीच घटना लोणीभापकर येथे घडली असून गावातील ३९ वर्षीय गणेश पांडूरंग भापकर यांची आईच्या नावावरील जमीन गट क्रमांक ७७२ मध्ये आहे. तेथील २२ हजार ५० रुपये किंमतीची लाजन्ट कंपनीची ५ अश्वशक्ती क्षमतेची पाणबुडी वीजपंप अज्ञात चोरट्याने पाईप व केबल तोडून चोरून नेला.
याच दरम्यान १७ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर या दोन दिवसाच्या मध्ये लोणीभापकर येथील योगेश त्र्यंबकराव भापकर यांच्या जमीन गट ७७३ मधील १३ हजार रुपये किंमतीची ३ अश्वशक्ती क्षमतेची पाणबुडी इलेक्ट्रीक मोटार अज्ञात चोरट्याने पाईप व केबलसह चोरून नेली. या सर्व गुन्ह्यांची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली असून वडगाव निंबाळकर पोलिस पुढील तपास करीत आहेत.
–











