डॉ. संदेश शहा, इंदापूर
भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारिता ओळखली जात असून यामध्ये पत्रकार हे समाजमनाचा आरसा आहेत. पत्रकारांनी जिथे चूक किंवा अन्याय होतो, तिथे जरूर लिहिले पाहिजे. मात्र जिथे चांगले काम होते तिथे कौतुक देखील केले पाहिजे. पत्रकार भवन होण्यासाठी तालुक्यातील पत्रकारांनी एक होणे ही काळाची गरज आहे असे मत राज्याचे क्रीडा, अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर पंचायत समितीच्या लोकनेते शंकररावजी पाटील सभागृहात पत्रकार दिन आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप झाला. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघाच्या दैनंदिन कामासाठी इंदापूर बस स्थानकासमोरील सार्वजनिक बांधकाम विभागाची जुनी इमारत भाडे तत्त्वावर द्यावी असे निवेदन भरणे यांना देण्यात आले.
भरणे पुढे म्हणाले, मला मिळालेले मंत्रीपदाचे श्रेय सर्वसामान्य जनता, पत्रकार व पक्षश्रेष्ठी यांना असून आता तुम्हाला देण्यासाठी माझ्या हातात खूप काही आहे. त्यामुळे पत्रकारांनी पत्रकार भवन होण्यासाठी एक होणे गरजेचे आहे. सध्या इंदापूर शहर व तालुक्याचा चेहरामोहरा बदलत आहे. भीमा नदीवरील शिरसोडी ते कुगाव पुलाचे काम जोरात सुरू असून त्यामुळे व्यापार वाढणार आहे. इंदापूर शहरात २०० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. त्यामुळे पत्रकारांनी चांगल्या कामाचे कौतुक तर जिथे चुकेल तिथे ते निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. मी बोलण्यापेक्षा काम करणारा कार्यकर्ता आहे. या पत्रकार संघात जुन्या बरोबरच तरुण पत्रकार देखील असून या पत्रकार संघाचे काम चांगले आहे.
भरत शहा म्हणाले, पत्रकारांचे शहर विकासासाठी महत्वपूर्ण योगदान असून नगरपरिषदेच्या मालकीचे सुसज्ज पत्रकार भवन बांधून दिले जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी पत्रकार भवनसाठी नगरपरिषदेने जागा दिल्यास खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून पत्रकार भवन साठी संपूर्ण निधी दिला जाईल असे आश्वासन दिले.
आयएमए चे इंदापूर तालुकाध्यक्ष डॉ. अनिल शिर्के म्हणाले, सर्व पत्रकारांच्या आरोग्याच्या तपासण्या मोफत करून पत्रकारांना योग्य आरोग्य विषयक मार्गदर्शन उपलब्ध करण्यासाठी तयारी दाखवली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी सर्व पत्रकारांच्या अडचणी जाणून घेवून सदर अडचणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सोडविल्या जातील अशी ग्वाही दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विधीज्ञ राहुल मखरे, छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, विधीज्ञ शुभम निंबाळकर, किरण गानबोटे, पांडुरंग शिंदे, गफुर सय्यद, शकील सय्यद, नंदकुमार गुजर, अरविंद वाघ, धरमचंद लोढा, विधीज्ञ गिरीश शहा, अमोल इंगळे, दत्तात्रय अनपट, हमीद आतार, महादेव चव्हाण यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या, तर युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सिताप यांनी पत्रकारांना पेढे भरविले.
यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शहा, जेष्ठ पत्रकार तानाजी काळे, महेश स्वामी, विधीज्ञ नारायण ढावरे, कैलास पवार यांनी पत्रकारांच्या विविध अडचणींकडे सर्वांचे लक्ष वेधले. पत्रकार संघाचे जिल्हा निरीक्षक शौकत तांबोळी, संघटक काकासाहेब मांढरे, सुरेश जकाते, शैलेश काटे, दीपक शिंदे, अंगद तावरे, विजय शिंदे, निलेश भोंग, आदित्य बोराटे, श्रेयश नलावडे, नाना घळके, रामवर्मा आसबे, दीपक खिलारे, अमोल गुरगुडे, भीमसेन उबाळे, अशोक घोडके, शिवाजी शिंदे, संतोष जामदार, डॉ. सिद्धार्थ सरोदे, मोहंमद कैफ तांबोळी यांनी नियोजन केले.











