कोल्हापूर : महान्यूज लाईव्ह
हेचि व्हावी माझी आस.. जन्मोजन्मी तुझा दास! पंढरीचा वारकरी.. वारी चुकू न दे हरी.. प्रत्येक वारकरी विठुरायाकडे हेच मागणी मागत असतो. घटना आहे, कोल्हापूर जिल्ह्यातल्या कसबा बावडा भागातील. उलपेमळा या भागात राहणारे पांडुरंग रामा उलपे या भागवत संप्रदायातील हरिभक्त परायण व्यक्ती बाबत ही घटना घडली आहे.
16 डिसेंबरच्या संध्याकाळी पांडुरंग उलपे हे विठ्ठल नामाचे जप करत होते अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. घामाघूम झालेले पांडुरंग उलपे जमिनीवर पडलेले दिसताच त्यांच्या पत्नी बाळाबाई उलपे यांनी घाबरून सगळ्यांना हाका मारल्या. शेजारचे सगळे धावत आले. तातडीने त्यांना गंगावेस येथील रुग्णालयात दाखल केले गेले. डॉक्टरांनी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे जाहीर केले.
त्यांच्या निधनाची माहिती भावकीत गावात समजली. नातेवाईक देखील घरी पोहोचले. परिसरातील वारकरी देखील आले. मग दवाखान्यातून त्यांचे पार्थिव घेऊन घरची मंडळी गावाच्या दिशेने निघाली, मात्र रुग्णवाहिकेतून माघारी निघताना रस्त्यावरच्या खड्ड्यातील धक्क्याने त्यांची हालचाल होत असल्याचे लक्षात आले आणि नातेवाईकांनी खात्री करून घेत त्यांना पुन्हा परिसरातील कदमवाडी येथील दवाखान्यात नेले.
तेथे मात्र डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू करताच त्यांचे शरीर पुन्हा उपचाराला प्रतिसाद देऊ लागले आणि नातेवाकांनी टाळ्यांचा गजर केला. सोमवारी एक जानेवारी रोजी दवाखान्यातून पूर्ण उपचार घेऊन अगदी खडखडीत बरा बरे झालेले पांडुरंग उलपे घरी पोहोचले.. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा! असे म्हणणाऱ्या वारकऱ्याच्या बाबतीत पांडुरंगाने कृपा केली असे सगळे म्हणू लागले.











