बीड : महान्यूज लाईव्ह
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपासून आतापर्यंत बीड मधील राजकारण आणि राजकीय व्यक्ती आणि गुन्हेगारी व्यक्ती यांच्या संबंधांविषयी चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी सीआयडीने वाल्मीक कराडच्या दुसऱ्या बायकोला ही चौकशीसाठी बोलावले. त्याचबरोबर याच प्रकरणाशी संबंधित चार महिलांची चौकशी केली. अशा प्रकरणांमध्ये महिलांची संख्या वाढत असल्याने राज्यभरात याची चर्चा सुरू आहे. त्यात आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी वेगळाच टोला मारला आहे.
विजय वडेट्टीवार त्यांनी सवाल उपस्थित केला आहे की, वाल्मीक कराड हा महायुती सरकारचा जावई आहे का? जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेत नाहीत? परभणी मध्ये भीमसैनिकावर कारवाई करताना पोलीस आक्रमक होते. मग बीडमध्ये कारवाई करताना आता पोलिसांच्या हाताला लकवा मारला आहे का? अशी टीका त्यांनी केली आहे.
त्याहीपेक्षा त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे, तो म्हणजे बीडमध्ये बिहार सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जमिनी लुटल्या. खंडणी मागितली जाते. महिलांवर अत्याचार होतात. दहा दहा बायका करा, पण कोणाचा खून करू नका. संतोष देशमुख यांच्या मुलीचे अश्रू पोलिसांना दिसत नाहीत, सरकारला दिसत नाहीत. वाल्मीक कराडची नार्को टेस्ट झाली पाहिजे असे वडेट्टीवार त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधताना मत व्यक्त केले आहे.











