शिरूर : महान्यूज लाईव्ह
पिंपळसूटी (तालुका शिरूर) येथील बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेल्या रक्षा निकम हिच्या कुटुंबीयांची भेट घेत वन विभागाच्या वतीने मदतीचा दहा लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे.
पिंपळसूटी येथे दिनांक 24 रोजी घोडनदी किनारी वास्तव्यास असणाऱ्या निकम कुटुंबातील रक्षा अजय निकम या चार वर्षाच्या चिमुकलीस अंगणात खेळत असताना बिबट्याने उचलून नेले होते. या हल्ल्यात रक्षाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर वनविभागाने तातडीने सदर भागात उपायोजना सुरू केल्या असून बिबट्या पकडण्यासाठी रात्रंदिवस शोध मोहीम राबवली जात आहे.
शुक्रवार दिनांक 27 रोजी जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे यांच्या हस्ते रक्षा हिच्या आई-वडिलांकडे दहा लाख रुपयांचा मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
यावेळी बोलताना सहाय्यक उपवनसंरक्षक अमृत शिंदे हे म्हणाले की, झालेली घटना दुर्दैवी असून ही हानी कदापि भरून येणार नाही, मात्र वन विभागाच्या वतीने तातडीची मदत म्हणून हा धनादेश देण्यात आला आहे. यावेळी रक्षा हिचे वडील अजय निकम यांनी सांगितले की, साहेब आमच्याबाबत जे झालं, तो मोठा धक्का आहे. या हल्ल्यातील बिबट्याला त्वरित जेरबंद करा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी एस एस कंक, प्रदीप चव्हाण, वनपाल भानुदास शिंदे, सुनील फलके, पोलीस पाटील वर्षा काळे, बाळासाहेब खळदकर, शशिकांत वेताळ, ऋषिकेश फराटे, फकीरभाई शेख,अशोक फराटे, दशरथ फलके आदी उपस्थित होते.
दरम्यान, गेले तीन दिवसांपासून रात्रंदिवस या भागात वन विभागाच्या वतीने बिबट्या पकडण्यासाठी शोध मोहीम राबवली जात असून, रात्रीच्या वेळी ड्रोन द्वारे देखील बिबट्याचा शोध घेतला जात आहे. या भागात लवकरात लवकर बिबट्या जेरबंद करण्यात येईल असा विश्वास सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे यांनी व्यक्त केला.











