कर्नाटकातील बंगळुरू तुमाकरू या राष्ट्रीय महामार्गावर 40 टनाचा कंटेनर व्होल्व्हो कंपनीच्या एक्स सी 90 या सर्वात सुरक्षित एसयुव्ही कारवर पडला आणि त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील मोरबागी या गावचे सुपुत्र व कर्नाटकातील आयएएसटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चांद्रयागोपाल गौल यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला.
ही घटना केवळ वजनदार कंटेनर अंगावर पडल्यामुळे झाली, असं नाही तर अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कारमध्ये देखील कोणीही सुरक्षित नसल्याचे उघड झाल्याने याची चर्चा जास्त झाली. कारण गेल्या 22 वर्षात या गाडीमध्ये प्रवास करणारे कोणीही कसल्याही अपघातात मरण पावलेले नाही. दरम्यान या घटनेत चंद्रयागोपाल यांची पत्नी गौरबाई, बहीण विजयालक्ष्मी तसेच चंद्रयागोपाल यांचा सोळा वर्षांचा मुलगा जान, दहा वर्षाची मुलगी दीक्षा आणि सहा वर्षाची भाची आर्या यांचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या लेन मधून जाणारा कंटेनर अचानक समोरून एक कार आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा कंटेनर रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या या गाडीवर कोसळला आणि ही दुर्घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी कंटेनरचा चालक आरीफ अंसारी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.











