पुणे : महान्यूज लाईव्ह
2024 ची अखेर आणि 2025 चे स्वागत यंदा पावसाने होण्याची शक्यता आहे कारण थंडी कमी झाली आहे आणि आभाळ वाढू लागले आहे.. 26 आणि 27 डिसेंबरला राज्यातील 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये ावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यातील पुण्यासह परभणी, जालना, वाशिम, वर्धा, अकोला, अमरावती, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये 26 आणि 27 डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट जाहीर केला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील निर्माण होणारी मोठी आद्रता पावसासाठी परिणामकारक ठरणार आहे. यामुळे महाराष्ट्राला देखील पावसाचा फटका बसण्याची शक्यता असून, त्यामध्ये गारपिटीसह तुफान पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या सूत्रानुसार किमान तापमानात या दोन दिवसांमध्ये दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता वर्तवली असून 27 डिसेंबर रोजी राज्यातील विदर्भासह मध्य महाराष्ट्रात गारपीट व वादळी पाऊस पडू शकतो.











