मुंबई : महान्यूज लाईव्ह
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे यांचा प्रवेश झाला असला, तरी त्यांच्यावरील गंडांतर अजूनही संपलेले नाही. बीडच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचा संबंध असल्याची टीका सध्या सर्वत्र सुरू आहे. या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मीक कराड असल्याची आरोपाची जंत्री सध्या विविध नेते मंडळी व बीड जिल्ह्यातील विरोधक करू लागले आहेत. अशा परिस्थितीत धनंजय मुंडे यांच्या पुढील अडचणी वाढविण्यासाठी अंजली दमानिया देखील पुढे सरसावल्या आहेत.
वाल्मीक कराड याच्याबद्दल विचारले असता धनंजय मुंडे यांनी आरोप फेटाळून लावत राजकीय हेतूने हे आरोप केले जात असल्याचे सांगितले होते. बीड जिल्ह्यात अनेक जण आपल्या सोबत फोटो काढतात. त्यांना नाही म्हणता येत नाही. एखादा व्यक्ती वैयक्तिक जीवनात काय करतो. त्याच्याशी आमचा संबंध येत नाही असे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिले, मात्र त्यानंतर अंजली दमानिया यांनी 88 एकराचा लेटरबॉम्ब टाकला असून यामध्ये धनंजय मुंडे यांचे मुखत्यार म्हणून वाल्मीक कराड असल्याचे विविध सातबारा उताऱ्यावरून दिसून येत आहे.
जगमित्र शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांचे नावे असलेले 88 एकराचे असलेले सातबारा उतारे अंजली दमानिया यांनी डिजिटल अपलोड केले होते. त्यामध्ये त्यांनी मुंडे आणि वाल्मीक कराड यांची संबंध असलेले पुरावे पहा असे सांगत ट्विटरवर हे उतारे अपलोड केले आहेत.
अंजली दमानिया यांनी शेअर केलेल्या 3554 गुंठे जमीन अर्थात 88 एकर 34 गुंठे या जमिनीचे सातबारा उतारे ट्विटरवर पोस्ट केले असून त्यामध्ये त्यांनी धनंजय पंडितराव मुंडे आणि वाल्मीक बाबुराव कराड यांच्यासह इतरही लोकांची नावे या उताऱ्यावर असून जगमित्र शुगर प्रायव्हेट लिमिटेड द्वारा मुखत्यार म्हणून ही नावे असल्याचे यातून दिसत आहे.











