बारामती : महान्यूज लाईव्ह
दोन दिवसांपूर्वीच शहरात कोयता गँगने एका युवकाचा मुडदा पाडला. त्यानंतर पोलिसांनी मोहीम तीव्र केली असतानाही दहशत माजवणाऱ्यांवर काहीच फरक पडल्याचे दिसत नाही. कारण आज पहाटेच्या वेळी देखील बारामतीमध्ये कोयता आणि लोखंडी कुऱ्हाड घेऊन काही युवक दहशत माजवत होते.
बारामती शहरातील आमराई परिसरात पहाटेच्या वेळी चौघेजण कोयता आणि कुराड घेऊन दहशत माजवत असताना पोलिसांना माहिती मिळाली आणि शहर पोलिसांनी या चौघा जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सोमनाथ पोपट कांबळे यांनी शहर पोलिसांकडे फिर्याद दिली.
त्यावरून पोलिसांनी शस्त्र अधिनियम 4, 25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3) /135 नुसार अनिकेत केशवकुमार नामदास (वय 19 वर्ष रा. दिपनगर भवानीनगर ता. इंदापुर जि.पुणे), 2) आदित्य राजु मांढरे (वय-22 वर्ष रा. चंद्रमणीनगर ता. बारामती जि.पुणे), ३) यश दिपक मोहीते (वय 19 वर्ष रा.इंदापुर रोड बुरुड हाउसिंग सोसायटी, बारामती ता. बारामती जि. पुणे) व 4) शुभम उर्फ बाळु काळू जगताप (रा. आमराई बारामती ता. बारामती जि.पुणे) या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
23 डिसेंबर रोजी पहाटे अमराईतील सुहास नगर परिसरात हे चौघेजण हातात लांब लोखंडी कोयता व लाकडी दांडा असलेली कु-हाड घेऊन दहशत माजवत होते याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन या चौघांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडील शस्त्रे ही ताब्यात घेतली. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार श्री मोरे करत आहेत.











