मुंबई : महान्यूज लाईव्ह
मुंबई दूत बोट दुर्घटनेत आत्तापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून अजूनही चार ते पाच जणांची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे अजूनही मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे मात्र याबरोबरच या घटनेत बचावलेल्यांच्या कहाण्या अंगावर शहारे आणत आहेत.
या 100 पेक्षा अधिक प्रवाशांमध्ये नाशिकच्या पिंपळगाव बसवंत मधील गेलेले कुटुंब देखील होते. या कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये आठ वर्षीय मिथुन अहिरे या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला पण दुसरीकडे एक बाळ मात्र वाचलं. ते तर अवघ्या 14 महिन्यांचे होतं. मुंबईच्या उपनगरातील कुर्ला येथे राहणाऱ्या वैशाली अडकणे त्यांचा भाऊ, त्यांची बहीण आणि त्यांचा अवघ्या 14 महिन्यांचा मुलगा शार्विल असे सगळे एलिफंटा गुहा पाहण्यासाठी निघाले होते. वैशाली अडकणे यांनी या घटनेची आपबिती सांगितली. बोटीत बसल्यानंतर 40 ते 50 मिनिटे झाले असतील तेवढ्यात एक पांढऱ्या रंगाची स्पीड बोट वेगाने येऊन धडकली त्या धक्क्याने सगळेजण एकमेकांच्या अंगावर पडले तेवढ्यात स्पीड बोटीतील एक जण उडून नीलकमल बोटीवर पडला. तो जाग्यावर गेला होता. दुसराही अस्वस्थ होता.
वैशाली अडकणे सांगत होत्या, आम्हाला वाटले काय झाले नाही पण ती बोट धडकल्याने आमच्या बोटीला भोक पडले होते आणि त्यात पाणी जाऊ लागले, तेव्हा आमच्या ड्रायव्हरने भीती भीतीने ओरडून लाईफ जॅकेट घाला असे सांगितले. ज्यांनी लाईफ जॅकेट घातले तेच बचावले. ज्यांना लाईफ जॅकेट मिळाले नाही, ते मात्र बुडून गेले. आम्ही बोटीला कसेबसे धरून तरंगत होतो. माझा मुलगा 14 महिन्यांचा शार्विल त्याला मला कसे करून वाचवायचे होते.
अक्षरशः या बाळाला पाणी लागू नये म्हणून हातावरती उंच धरलं. अजून पाच ते दहा मिनिटे नौदलाच्या बोटी आल्या नसत्या, तर आम्ही सुद्धा राहिलो नसतो असे अडकणे यांनी सांगितले. एका परदेशी दाम्पत्याने या बोटीवरील अनेकांचे जीव वाचवले स्वतःच्या जीवाची परवा केली नाही असे अडकणे सांगत होत्या.











