मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा बेट यादरम्यानच्या जलमार्गावर जी घटना घडली त्या घटनेच्या आपबितीच्या कहाण्या आता बाहेर येऊ लागल्या आहेत या घटनेत जो वाचला तो श्रवण कुमार नावाचा पर्यटक या घटनेचा थरार सांगत होता..
श्रवण कुमार जितू चौधरी व नाथा चौधरी हे तिघेजण मित्र मुंबई पाहण्यासाठी आले होते. मुंबई पाहता पाहता त्यांना गेटवे ऑफ इंडिया वरून एक बोट समुद्र सफारी करते आणि एलिफंटा बेटावर घेऊन जाते. त्या ठिकाणी गुहा पाहण्यासारख्या आहेत अशी माहिती मिळाली आणि श्रवण कुमारने तिकीट काढले.
नीलकमल बोटीचे तिकीट घेऊन श्रवण कुमार जितू आणि नाथा चौधरी मौज मस्ती करत होते. वरच्या डेक वर त्यांची मौजमस्ती सुरू होती आणि आपल्या पहिल्यावहिल्या समुद्रसपारीचा व्हिडिओ काढण्यात तिघेही मग्न होते. रिल्ससाठी मोबाईलवर व्हिडिओ काढत होते. हा व्हिडिओ काढता काढताच तीन-चार फेऱ्या मारणाऱ्या स्पीड बोट वर त्यांची नजर खिळली आणि ते त्याचाही व्हिडिओ काढत होते.
ही स्पीड बोट चार फेऱ्या मारल्यावर अचानक बोटीवर धडकली आणि सगळीकडे हाहाकार माजला. घाबरून सगळ्यांनी पळापळ सुरू केली आणि तेवढ्यात अवघ्या तीन मिनिटांमध्ये बोट समुद्रात कलंडली. कोणीतरी फेकलेले लाईफ जॅकेट श्रवण कुमारच्या हातात लागले. मात्र ते एका लहान मुलाचे होते, मग ते बाजूला टाकून हातात फळांचा किंवा मासे ठेवायचा रिकामा क्रेट घेतला आणि त्याचा आधार घेत श्रवणकुमार तरंगू लागला.
श्रवणकुमार सांगत होता, आजूबाजूला काहीजण बुडायला लागले होते. आई-वडिलांबरोबर एक लहान मूल होते आणि ते अचानक बेपत्ता झाले. आई जोरात ओरडली आणि आमच्याही छातीत धस्स झाले. आता जणू सारं काही संपलं आहे असंच वाटू लागलं. तेवढ्यात नौदलाचे कर्मचारी आणि नौदलाच्या बोटी तिथे पोहोचल्या आणि आता आपण वाचू शकू याचा अंदाज आला.
खरंतर बोटीवर बसतानाच लोकांना लाइफ जॅकेट द्यायला हवे, परंतु काल घटना घडल्यानंतर लोकांना बाकीच्या बोट चालकांनी लाईव्ह जॅकेट द्यायला सुरुवात केली. एवढेच नाही तर दुर्घटनाग्रस्त बोटीवर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसल्याचेही दिसून आले आहे. कारण या बोटीमध्ये 90 तिकीट देण्यात आली होती अशी माहिती मिळू लागली आहे.











