मुंबई : महान्यूज लाईव्ह
काल राज्याचे मंत्रिमंडळ जाहीर झाले. यामध्ये भाजपचे 19 मंत्री शिवसेनेचे अकरा मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नऊ मंत्र्यांनी नव्याने शपथ घेतली. मात्र मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर राज्यामध्ये धुसफुशीला सुरुवात झाली. छगन भुजबळ यांनी जहा नही चैना, वहा नही रहना म्हणत आपला राग व्यक्त केला तर दुसरीकडे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी देखील नाराजी बोलून दाखवली.
माजी मंत्री विजय शिवतारे यांनी थेट आपण बिहारच्या मार्गाने चाललोय असे मत व्यक्त करत माझ्यासाठी मंत्री पद महत्त्वाचं नाही, मला लोकांनी निवडून दिले. मला त्यांच्यासाठी काम करायचं आहे. दुःख एवढेच आहे की, महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे? माझा मंत्रीपदाचा पत्ता कट झाल्याबद्दल अजिबात दुःख नाही पण ज्या पद्धतीने विश्वासात घेऊन काम करायला हवं ते न झाल्याने नाराजी नक्कीच आहे. अडीच वर्षानंतर मंत्रीपद दिले तरी मी घेणार नाही. मला गरज नाही, पण मला दिलेल्या वागणुकीवरून प्रचंड राग आहे असे ते म्हणाले.
दुसरीकडे छगन भुजबळ हे देखील नाराज असल्याचे समजते त्यांनी सत्कार न स्वीकारता तडकाफडकी नाशिक गाठले. मी काय तुमच्या हातातील खेळणे आहे का? असा सवाल छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीला विचारला. शेपूट घालून बोलू का? रोखठोकच बोलणार! माझी सवय आहे. शिवसेनेत असल्यापासून मी रोखठोक बोलतो. लासलगाव माझा मतदारसंघ आहे. समता परिषदेचे नेते आणि कार्यकर्ते आहेत. तेथे मी जाऊन मी त्यांच्याशी बोलेन. नंतरच माझा निर्णय घेईल, मात्र एक सांगतो.. जहा नही चैना वहा नही रहना असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेत असल्याचेच एका पद्धतीने स्पष्ट केले.
ते म्हणाले, या निवडणुकीत ओबीसी समाज महायुतीच्या पाठीशी होता. लाडकी बहीण पाठीशी होती. म्हणून आम्हाला बहुमत मिळालं. आम्हाला वाटलं होतं, राष्ट्रवादीचे तीस आमदार कसे तर येतील; पण एकदम 40 आले. बाकीच्या पक्षांचेही आमदार झाले. पण मला डावण्याचं काही कारण नव्हतं. जुने झाले द्या फेकून असं चालत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत मला उभं राहायचं नव्हतं. तरीही मला उभं राहायला सांगितलं. मी तयार झालो. मतदारसंघात मेहनत घेतली. नंतर माझं नाव जाहीर झालं नाही. मग मीही लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. मी काही मंत्रीपदावरून नाराज नाही. मला ज्या पद्धतीने पक्षात वागणूक दिली जात आहे, त्यामुळे मी नाराज आहे असे ते म्हणाले.
राज्यसभेच्या दोन जागा होत्या. त्यातील एक जागा सुनेत्रा वहिनींना सोडली. नितीन पाटील यांना दुसरी जागा दिली. काय तर म्हणे, तुला खासदार करेल; असं मी नितीन पाटील यांना जाहीर सभेत सांगितलं होतं. त्यामुळे राज्यसभा दिली. मी मनात म्हटलं, अरे व्वा..त्यावेळी मला राज्यसभा दिली नाही. नंतर मला म्हणाले, तुम्ही विधानसभा लढवा, तुमच्यामुळे पक्ष मजबूत होईल. मी उभा राहिलो. मनोज जरांगे पाटील सकाळी दहा वाजेपासून रात्री उशिरापर्यंत माझ्या मतदारसंघात फिरत होते. माझे 30 हजाराने मताधिक्य देखील घटले, पण मी निवडून आलो. आता मंत्रीपदाची शपथ घेण्याची वेळ आली, तेव्हा म्हणाले राजीनामा द्या. राज्यसभेवर जा. आम्ही नितीन पाटलांचा राजीनामा घेतो. का? तर त्यांच्या भावाला मकरंद पाटलांना मंत्री करायचं आहे. मला काय लहान पोरासारखं खेळवता? मान नाही, तिथे सोन्याचं पान दिलं तरी काय करायचंय मला ? असा सवाल त्यांनी केला आहे.
दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष म्हणून रामदास आठवले देखील नाराज झाले आहेत. फडणवीस यांच्याकडे आपण मंत्रीपदाची मागणी केली होती. एक विधान परिषद, एक मंत्रीपद आणि काही महामंडळे अशी आम्ही फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. महायुतीला मिळालेल्या यशात आमच्या पक्षाचा मोठा वाटा आहे, तरी देखील आम्हाला का टाळलं हे माहित नाही. आम्ही त्यांची भेट घेऊन बाकी असलेल्या खात्यांची मागणी करणार आहोत. आम्ही तुम्हाला प्रामाणिकपणे मत देतो, पण मग मंत्रीपद देत नाहीत, असं का? माझ्या पक्षाचे आमदार, कार्यकर्ते देशांमध्ये आहेत. आमची नाराजी आहे. आमचा फडणवीस यांनी विचार करावा अशी मागणी आठवले यांनी केली आहे.











