संदीप मापारी पाटील बुलढाणा
घटना बुलढाणा जिल्ह्यातील अमडापूर येथील. चिखलीहून उदयनगर ला जात असलेल्या तीन युवकांचा शुक्रवारी रात्री एका भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेने जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या अपघाताच्या घटनेत प्रतीक भुजे व प्रथमेश भुजे या चुलत भावांसह सौरभ शर्मा हा मित्रही मृत्युमुखी पावला. हे तिघेजण चिखली गावावरून उदयनगर येथे जात होते. अमडापूर परिसरात त्यांची दुचाकी आली असता, अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि यात तिघेही जागीच ठार झाले.
या घटनेनंतर वाहन चालक पळून गेला. पोलिसांनी अपघात ग्रस्त वाहनाचा तपास सुरू केला असून परिसरातील रस्त्यातील सीसीटीव्ही फुटेच्या आधारे वाहनाची ओळख पटवून आरोपी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. या घटनेनंतर परिसरात गर्दी जमली होती.
पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर कर्मचारी लक्ष्मण टेकाळे यांनी घटनास्थळ गाठून उदयनगर येथील श्रीकांत राऊत, गणेश भुजे आणि इतरांच्या मदतीने तिघांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय चिखली येथे नेले, मात्र उपचारापूर्वीच ते तिघेही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले दरम्यान या प्रकरणी अमडापूर येथील श्याम भुजे यांनी पोलिसांकडे फिर्यादी दिली त्यावरून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान या तिन्ही युवकांवर खामगाव रस्त्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.











