मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याच्यासह सात जणांचा सहभाग आढळल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यावरून फौजदार राजेश पाटील याला निलंबित करण्यात आले. आता पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून, त्याच्या जागी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यातील विष्णू चाटे याच्यासह सात जणांचा सहभागीय हत्याप्रकरणात आढळल्यानंतर तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र अजूनही चार आरोपी फरार आहेत. आवादा पवनचक्की प्रकरणात खंडणी वसुलीच्या पार्श्वभूमीवर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले आणि त्यांचा अतिशय क्रूरपणे खून करण्यात आला. संतोष देशमुख आणि त्यांचा वाहनचालक हे चार चाकी वाहनातून मस्साजोग गावाकडे जात असताना डोणगावजवळ त्यांची गाडी अडवून त्यांना काठीने बेदम मारहाण करण्यात आली व बळजबरीने अपहरणकर्त्यांनी त्यांच्या गाडीत त्यांना केजच्या दिशेने नेले.
त्यानंतर काही वेळातच बोरगाव दहिटणे मार्गावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर राज्यभरात प्रचंड संतापाची लाट उसळली. सीआयडी व सीबीआयकडे हा तपास द्यावा यासाठी आंदोलने देखील झाली. मात्र अद्यापही मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत आणि घटना घडल्यानंतर अपहरणाची तक्रार घेण्यासाठी पोलिसांनी चार तास देशमुख यांच्या भावाला बसवून ठेवले. त्यामुळे पोलिसांबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.











