नवी दिल्ली : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा 84 वा वाढदिवस दिल्लीमध्ये संसदेचे अधिवेशन असल्याने दिल्लीत साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षातील उपमुख्यमंत्री अजित पवारांसह त्यांचे सर्व नेते शरद पवारांना भेटले. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा देखील शरद पवारांना भेटले. राज्यसभेत उपराष्ट्रपती आणि सभापती जगदीप धनकड यांनी शरद पवारांचे कौतुक केले.. बस्स.. त्यानंतर वृत्तवाहिन्यांनी जे आभाळ हाणले, ते काहीच्या बाहीच..!
गेल्या दोन दिवसापासून देशभरातील वृत्तवाहिन्यांपेक्षा मराठी वृत्तवाहिन्यांमधील अँकर पोटतिडकिने, प्रचंड आस्था असल्यासारख्या काही बातम्या पेरू लागल्या आहेत. बीडमध्ये एका सरपंचाचा अत्यंत क्रूरपणे खून होतो, त्यावरून समाजमन अस्वस्थ असताना मीडिया दिल्लीच्या घडामोडींवर व्यस्त आहे. परभणीमध्ये संविधानाची तोडफोड करणाऱ्याला मनोरुग्ण घोषित करून दुसरीकडे संचारबंदी सुरू आहे. त्या घटना महत्त्वाच्या असताना माध्यमांना मात्र राजकारणात इंटरेस्ट आहे.. हे म्हणजे रोम जळत असताना फिडेल वाजवण्यात मग्न झालेल्या राजासारखेच आहे..
विशेष म्हणजे निवडणुकीच्या काळातही प्रचंड घाई गडबड दाखवणाऱ्या या वृत्तवाहिन्या आता तर महाविकास आघाडीचे सगळे खासदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवा स्वतःहूनच पसरवू लागल्या आहेत. याला फक्त सूत्रांचा आधार आहे.. ही सूत्रे त्यांच्याच मर्जीतील असतात बरं! भाजपपेक्षा वृत्तवाहिन्यांच्या संपादकांना आणि मालकांनाच हे ऑपरेशन लोटस हवे अशी मनोमन इच्छा आहे असेच दिसते. कदाचित त्यांना टास्क देखील तसा दिला असावा, त्यांची चूक नाही. परंतु कमरेचे डोक्याला गुंडाळल्यानंतर थोडी तरी अब्रू वाचेल असे काहीतरी करावे असे कोणालाच वाटत नाही.
शरद पवारांना अजित पवार भेटले, शरद पवारांना अमित शहा भेटले, आणि लागलीच वृत्तवाहिन्यांचे रात्री आठ नंतरच्या ग्लास ‘बशा’ बैठकीतील सूत्रे जागी झाली. शरद पवार व अजित पवार एकत्र येणार अशा चर्चांपेक्षा जणू ते एकत्र आलेच आहेत, अशा स्वरूपाच्या बातम्या सुरू झाल्या. त्यावरून राजकीय नेत्यांना तर्फे प्रश्न विचारले जाऊच लागले, पण ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही, त्यांनाही ते प्रश्न विचारले जाऊ लागले. लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे यश विधानसभा निवडणुकीनंतर अचानक लोपले गेले आहे. लोकांनी निवडून दिलेल्या खासदारांना आता तुमचे पक्ष नव्हे, तर केवळ भाजपच तुमच्यासाठी योग्य आहे असे एका अर्थाने वृत्तवाहिन्याच ठणकावून सांगू लागल्या आहेत, असेच एकंदरीत दिसते. माध्यमांचा हा न्यायदत्त ठेका आहे की कंत्राट?
दोन दिवसांनी उद्या शरद पवार एका ओळीत जर सगळ्या बातम्यांचा कार्यक्रम करतील, तर त्याची मात्र बातमी या वृत्तवाहिन्या एवढ्या रसभरीतपणे आणि एवढ्या वेळा देणार नाहीत हे नक्कीच! अर्थात ज्या देशात गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीचे चित्रपट लोक डोक्यावर घेत असतील, त्या देशातील लोकांना कुठलेही नेरेटिव्ह वृत्तवाहिन्या अगदी च्यवनप्राश सारखे गळी उतरवू शकतात आणि हीच आजची शोकांतिका आहे.











