ही घटना तशी पाहिली तर दोन गटात विभागणारी… एकीकडं आरोपीला शिक्षा द्यायला न्यायव्यवस्था आणि कायदा आणि सुव्यवस्था आहे असे सांगणारी आणि दुसरीकडे ज्यांच्यावर विश्वास ठेवायचा ती पोलीस यंत्रणाच जर कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत करत नसेल तर कायदा हातात घ्या असे सांगणारी.. आपल्या अल्पवयीन मुलीवर नातेवाईकांनीच केलेल्या लैंगिक शोषणाचा राग मनात एवढा भिनला होता की, बाप थेट कुवेतवरून आंध्र प्रदेशात पोहोचला. आरोपीला जीव मारले आणि सोशल मीडियावर केलेल्या गुन्ह्याची कबुली देखील स्पष्टपणे दिली..
आंध्र प्रदेशातील या घटनेची सध्या देशात चर्चा सुरू आहे. आंध्रप्रदेश मधील अण्णामय्या जिल्ह्यातील ओबुलवारीपल्ली या गावानजिकची ही घटना. या घटनेतील आताचा खून प्रकरणातील आरोपी अंजनेय हा त्याच्या पत्नी समवेत कुवेतमध्ये काम करतो. त्याची बारा वर्षाची मुलगी मात्र आजी आजोबांजवळ गावाकडे होती. काही दिवस ती मावशीच्या घरी राहायला गेली.
याच दरम्यान मावशीच्या सासर्याने तिचे लैंगिक शोषण केले. तिने तिच्या मावशीकडे त्याची तक्रार केली, मात्र मावशीने तिला गप्प राहण्यास सांगितले. त्यानंतर मावशीने बहिणीला तिच्या मुलीला घेऊन जाण्यास सांगितले. जेव्हा नवरा बायको कुवेत वरून गावाकडे आले, तेव्हा मेहुणीने मेहुण्याला आणि बहिणीला सारी गोष्ट सांगितली. त्यानंतर मेहुणीच्या सासरेविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार देखील देण्यात आली.
मात्र आरोपीच्या विरुद्ध पोलीस काहीच कारवाई करत नव्हते, उलट हे प्रकरण मिटवण्यासाठी पोलीस दबाव टाकत होते असा मुलीच्या वडिलांच्या डोक्यात राग होता. या प्रकरणात संबंधित आरोपीला पोलिसांनी समज देऊन सोडले. त्यानंतर चिडलेल्या अंजनेय याने सात डिसेंबर रोजी कुवेतवरून गाव गाठले आणि रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर झोपलेल्या मेहुणीच्या सासर्याला लोखंडी रॉडने मारहाण करत खून केला.
त्यानंतर आरोपी अंजनेय याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित करून आपणच याचा खून केल्याचे सांगत पोलिसांसमोर शरण येण्याची तयारी दाखवली. पोलिसांनी सध्यातरी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास राजमपेट पोलीस करत आहेत.











