हैदराबाद : महान्यूज लाईव्ह
मनोरंजन आणि वास्तव वेगवेगळे असतं… पण जेव्हापासून गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे चित्रपट लोक डोक्यावर घेऊ लागले आहेत तेव्हापासून सारंच ताळतंत्र बिघडलं आहे. रक्तचंदनाची तस्करी आपण किती भन्नाट पद्धतीने करतो हे दाखवणाऱ्या अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचा क्लायमॅक्स मात्र खरोखरीच्या पोलिसांनी केला आहे. कोणापुढे झुकणार नाही म्हणणाऱ्या आणि त्याच्या या डायलॉग वरून वास्तव जीवनात रस्त्यावर रोमिओगिरी करणाऱ्या पोरांना देखील कळलं असेल की कानून के हात बहुत लंबे होते है! कारण पोलिसांनी अल्लू अर्जुन ला खरोखरच अटक केली आहे.
4 डिसेंबर रोजी पुष्पा 2 या चित्रपटाच्या प्रीमियर शो साठी स्वतः अभिनेता अल्लू अर्जुन व त्याचे कुटुंबीय थेटर मध्ये पोहोचले होते. त्या ठिकाणी त्याला पाहण्यासाठी एवढी गर्दी झाली की, त्यामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर दक्षिणेकडे मोठी चर्चा सुरू झाली. त्यावरून अल्लू अर्जुन विरोधात पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. आज त्याला अटक करण्यात आली.
हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये हा प्रकार घडला होता. यामध्ये हैदराबाद मधील दिलसुखनगर येथील रेवती नावाची महिला, तिचा पती भास्कर, नऊ वर्षीय मुलगा श्रीतेज व मुलगी संविका यांच्यासमवेत पुष्पा दोन नावाचा पिक्चर पाहण्यासाठी गेली होती. या ठिकाणी स्वतः अल्लू अर्जुन आल्याचे कळताच त्याला पाहण्यासाठी गर्दी झाली. या गर्दीत चेंगराचेंगरी झाली आणि रेवती ही बेशुद्ध पडली. तिला डॉक्टरांनी तातडीने सीपीआर दिला, मात्र तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुन विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 105 118 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता त्यानंतर त्याच्या विरोधात विनाजामीन वॉरट देखील करण्यात आले होते. आज त्याला अटक करण्यात आली. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी पोलीस अल्लू अर्जुन ला अटक करण्यासाठी गेले. त्यावेळी त्याने मला कपडे तरी बदलून द्या अशी विनंती केली होती, मात्र त्याची फक्त कॉफी पिण्याची इच्छा पूर्ण करण्यात आली आणि पोलिसांनी त्याला अटक केली.
दरम्यान या घटनेमध्ये अल्लू अर्जुन याच्यासह संध्या चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनावर व अल्लू अर्जुन च्या सुरक्षा पथकावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अल्लू अर्जुन ला अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी गांधी हॉस्पिटल ला त्याला नेण्यात आले. त्यावेळी तिथे गर्दी झाली होती. यावेळी त्याच्या समवेत त्याची पत्नी स्नेहा रेड्डी, भाऊ शिरीष व वडील अरविंद त्याच्यासमवेत होते.











