बीड : महान्यूज लाईव्ह
घटना आहे, बीड जिल्ह्यातील बीडच्या के एस के महाविद्यालयातील! परीक्षा सुरू असतानाच बीएसस्सी पदवीच्या तिसऱ्या वर्षाचा पेपर लिहीत असलेला विद्यार्थी हृदविकाराच्या झटक्याने कोसळला आणि उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले.
सिद्धार्थ राजेभाऊ मिसाळ असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो बीड शहरातील केएसके महाविद्यालयात बीएससी पदवीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. तो बीएससी बरोबरच स्पर्धा परीक्षेची देखील तयारी करत होता. त्यासाठी तो दिल्ली येथे अभ्यास करत होता. मात्र बीएससी परीक्षेसाठी तो बीडमध्ये आला. आज सकाळी महाविद्यालयात तो परीक्षेसाठी पोहोचला आणि पेपर लिहीत असतानाच त्याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
सिद्धार्थला अचानक कोसळल्याचे पाहिल्यानंतर शिक्षकांनी तातडीने धावपळ केली. सिद्धार्थला हॉस्पिटलला नेण्यात आले. मात्र तेथे नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. सिद्धार्थ याचे वडील खाजगी वाहनावर चालक असून त्याची आई एका दुकानात काम करते. त्याच्या बाबतीत अशी घटना घडल्याने परिसरात वातावरण शोकाकुल झाले होते. कोरोना नंतर अलीकडे युवकांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढू लागले असल्याने वैद्यकीय क्षेत्रात देखील चिंता व्यक्त केली जात आहे.











