मी पाहिलेली माणसं : शशांक मोहिते, बारामती
मी गुवाहाटीहून तवांगच्या दिशेने जात असताना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. ” मैं भिकू बोल रहा हूँ. आप गुवाहाटी आके आगे ऐसे कैसे निकल गये ? मुझे आपसे मिलना था।” जान न जान मैं तेरा मेहमान असा हा कोण बरं आहे याचा विचार करेपर्यंत बारामतीहून डाॅ.यती कोकरे यांचा फोन आला.” शशांक, गुवाहाटीला जातोयस हे अगोदर माहीत असते तर माझ्या मित्रासाठी म्हणजे भिकूसाठी तुझ्याकडे एक भेट दिली असती.” तेव्हा लक्षात आले की हा भिकू आपल्या मित्राचा मित्र म्हणजे फेसबूकच्या भाषेत Mutual friend आहे.
आमच्या नियोजनाप्रमाणे परतीच्या प्रवासात दोन आठवड्यांनी गुवाहाटीला एक मुक्काम होता. तेव्हा संध्याकाळी 7 वाजता भिकू महाशय भेटायला येणार होते. पावणेसात वाजता मला भिकूचा फोन आला,” शशांक, मैं अभी आपसे मिलने आ रहा था।लेकिन अभी पोलिस स्टेशन में हूँ। बेल करने की प्रोसेस में हूँ ।” आणि फोन कट झाला.
च्यायला, म्हणजे डाॅक्टरांनी आपली कुठल्या भाईशी गाठ घालून दिली आहे. तो भेटला नाही हे बरेच झाले असे वाटले. दुसर्या दिवशी सकाळी फोन करुन भिकू भेटायला आलाच. आल्यावर समजले की भिकूचे नाव इंद्रजीत मुजूमदार असून तो व्यवसायाने वकील आहे. दोन तीन बँकांसाठी कायदेशीर सल्लागार म्हणून काम करतो. माझे बारामती येथील टीसी काॅलेजचे वर्गमित्र यती कोकरे पुढील शिक्षणासाठी पुण्याला असताना हा इंद्रजीत उर्फ भिकू त्यांचा हाॅस्टेलवरील खास मित्र होता. भिकूभाईने तेव्हाच्या हाॅस्टेललाईफमधील अनेक मजेशीर किस्से मला सांगितले.
पण बोलता बोलता “काल मी एका Client च्या जामिन प्रोसेससाठी पोलिस स्टेशनला वकील म्हणून गेलो होतो.” हे जेव्हा भिकूभाईने सांगितले तेव्हा मी भिकूभाईला बोललो,” मुझे लगा आपकोही पुलिसने अरेस्ट करके थाने में बंद करके रखा है और ये आपके खुद के जमानत का प्रोसेस शुरू है इसलिये आप नहीं आये।” खळखळून हसलो. त्यानंतर आसामच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीविषयी सहज विचारणा केल्यानंतर मात्र तो थोडा गंभीर झाला. हळूहळू आसाममधील तेव्हाच्या आणि सध्याच्या परिस्थितीबद्दलही तो बरेच काही बोलू लागला.
गोपीनाथ बोरडोलोई यांनी स्वांतंत्र्यपूर्व काळात आसामचे पंतप्रधान म्हणून आणि स्वातंत्र्यानंतर जेव्हा आसामचे राज्य सरकार अस्तित्वात आले तेव्हा आसामच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाचा मान पटकावला. देश विकासाची मुळाक्षरे गिरवत असताना आसाममध्ये मात्र वेगळाच प्रश्न उपस्थित राहत होता. पूर्व पाकीस्तान (1971 नंतरचा बांगलादेश) येथील लोकांनी मोठ्या संख्येने आसाम राज्याच्या क्षेत्रामध्ये घुसखोरी सुरु केली. तसेच बिहार,पश्चिम बंगाल या राज्यातून मजूर,कामगार,व्यापारी यांचे प्रमाण वाढू लागले. स्थानिक आसामी भुमिपूत्र बाजूला फेकला जातोय की काय, या भावनेने 1979 साली आसाम मधील भुमिपुत्रांच्या हक्कांसाठी तसेच स्वायत्त राज्याच्या मागणीसाठी ‘उल्फा’ संघटना स्थापन झाली. उल्फाने नंतरच्या काळात स्वतःची सशस्त्र फौज तयार करणे सुरू केले.
आपल्या मागण्या मंजूर करण्यासाठी दहशतवादी कारवायांकडे वळलेल्या या उल्फाच्या चळवळीचा 90 च्या दशकात फार बोलबाला होता. आसामधील चहाच्या मळ्यांच्या व्यापार्यांकडून मोठ्या प्रमाणात खंडणी गोळा करणे, मान्यवरांचे अपहरण करणे, तस्करी करणे अशा अनेक गोष्टींमुळे उल्फाची आसाममध्ये दहशत होती. काही स्थानिकांचा त्यावेळेस त्या संघटनेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठींबा होता. दहावी बारावी परिक्षा पास झालेल्या तरुणांना भरपूर पगाराचे आमिष दाखवून संघटनेत नोकरी व हातात रायफल मिळत होती. शिवाय परिसरात वट निर्माण होत असल्याने अनेक तरुण उल्फा च्या जाळ्यात अलगद सापडत होते.
काही पालक मात्र आपली मुले या दृष्टचक्रात न अडकता बाहेर पडावीत यासाठी आपल्या मुलांना आसामपासून दुरवर पुणे, मुंबई येथे शिक्षणासाठी पाठवत तेव्हाच त्यांच्या जीव भांड्यात पडत असे. भिकू उर्फ इंद्रजीत त्यामुळे पुण्यात शिकायला पाठवण्यात आलेला मुलगा होता. त्यामुळे तेव्हा पुण्यात शिक्षणासाठी जाणं म्हणजे या संघटनेच्या पिंजर्यात सापडण्याआधीच एखाद्या पाखराने मोकळ्या आकाशात भरारी घेण्यासारखे होते.
मागील वर्षी 29 डिसेंबर 2023 रोजी केंद्र सरकार व आसाम राज्य सरकारसोबत उल्फा संघटनेचे प्रमुख अरबिंदा राजखोवा यांनी त्रिपक्षीय शांती करारावर स्वाक्षरी केली. आसाममध्ये सध्या विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. विद्यमान मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा हे काँग्रेसमधून भाजपमध्ये येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर काय घडामोडी घडल्या ? सध्या ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाजवळचे महत्वाचे नेते कसे झाले आहेत वगैरे गप्पा झाल्या.
थोडक्यात इंद्रजीत मुजूमदार उर्फ भिकूभाई हे कसलेल्या वकीलाप्रमाणे आसामच्या राजकीय, सांस्कृतिक इतिहासाविषयी जोरदार आर्ग्युमेंट करत होते. फक्त मी न्यायाधीशाच्या भुमिकेत नसल्याने समोर असलेली दही कचोरी फडशा पाडत हे शांतपणे ऐकत होतो. आर्ग्युमेंट संपवून भिकूभाई जायला निघाले. डाॅ. यती कोकरे यांच्यासाठी खास आसामची चहापावडर व मिरचीचे झणझणीत लोणचे घेऊन ते आले होते. अर्थात ते यतीपर्यंत मी जसे आहे तसे पोहोचवेल की नाही अशी शंका या वकीलांना वाटल्यामुळे माझ्यासाठीही सेम तेवढ्याच गोष्टी त्यांनी गिफ्टपॅक करुन आणल्या होत्या.
बारामती साहित्यकट्टा व कृषी विज्ञान केंद्रातील व्याख्यानाच्या निमित्ताने आत्ता मंगळवारी बारामतीला जाणे झाले. तेव्हा डाॅ. यती यांच्याकडे त्यांची भेट सुपूर्द केल्यावर अर्ध्या तासात भिकूभाईचाच मला थँक्सवाला मेसेज आला. असा आहे हा भिकूभाई उर्फ इंद्रजीत मुजूमदार उर्फ गुवाहाटीकर. आता मी डाॅ. यती कोकरे यांना विनंती करणार की, पुढील वेळेस गुवाहाटीला जाताना भिकूभाईसाठी रीटर्न गिफ्ट जरूर द्या. म्हणजे ते देण्याच्या निमित्ताने परत एकदा भिकू भेटेल. आसामबाबत अजून नविन माहिती मिळेल.
आता गुवाहाटीला जाण्यासाठी परत एकदा नविन राजकीय घडामोडी घडण्याचीही गरज नाही. आता महाराष्ट्रात राजकीय स्थैर्य आल्याने फक्त पर्यटनासाठी, आसाममधील समृध्द संस्कृती समजून घेण्यासाठीही आपण गुवाहाटीला जाऊ शकतो. कारण गुवाहाटीला गेल्यानंतर आपल्या खिशात, आठवणींत नविन काही ना काही नक्की पडते.











