किरण माने, मराठी नाट्य अभिनेते.
…लै लै लै भारी मार्ग काढलावता राव गांवकर्यांनी. ‘इनोव्हेटिव्ह’ आंदोलन होतं… फक्त बारा तास शांततेच्या मार्गानं चालणारा एक इंटरेस्टिंग पण साधा प्रयोग होता.. कुणालाही हिंसा न पोहोचवता, न दुखावता केलेला ! असंवैधानिक, बेकायदेशीर वगैरे तर अजिबात नव्हता.
…त्र्याहत्तर साली काँग्रेस सरकारने पेट्रोल सात पैशांनी वाढवलं म्हणून अटलबिहारी बाजपेयींनी संसदेवर बैलगाडी मोर्चा काढला होता. असाच मस्त प्रकार होता तो ही. त्या मोर्चाला कुणीही अडवलं नव्हतं.
…त्र्याहत्तरमध्येच हिमालयाच्या पर्वतरांगामधली जागा सरकारनं एका मोठ्या उद्योगपतीला दिली. कंपनीसाठी होणारी वृक्षतोड वाचवण्यासाठी जनतेनं अनोखं आंदोलन केलं. कंत्राटदार झाडं तोडायला आला की, लोक झाडाला मिठी मारून उभे रहायचे. कसलं भारी होतं राव हे ‘चिपको आंदोलन’ ! कर्फ्यू लावून, बंदुका रोखुन हे थांबवणं सहज शक्य होतं.. पण या आंदोलनापुढं झुकून सरकारनं वृक्षतोड थांबवली.
…पंच्याऐंशीमध्ये आदिवासींच्या जमिनी वाचवण्यासाठी ‘नर्मदा बचाव’ हे मोठं आंदोलन झालं. सरकारनं हे आंदोलन दडपण्याचा क्रूर प्रयत्न केला, पण त्यावेळच्या बाणेदार मिडीयानं देशभर आंदोलकांच्या बाजूनं वातावरण निर्माण केलं…कारण मिडीयाचं स्वातंत्र्य अबाधित होतं !
…आणि अण्णा हजारेंचं आंदोलन आपण पाहिलंय. ते होऊच न देण्याइतकी काँग्रेसची पॉवर होती… पण अण्णांचा अधिकार जपला गेला. त्यावेळीही स्वाभिमानी मिडीयानं सरकारच्या दबावाखाली नं येता आण्णांना हिरो बनवलं. आमीरखान त्या आंदोलनात सामील झाला, म्हणून त्याला कुणी बायकॉट नाही केला.
…अगदी परवापरवा ठाकरेंचे सरकार असताना एसटी कामगार आंदोलन झालं. बंदी घातली? नाही. त्या आंदोलकांच्या म्होरक्यानं तर बिग बॉस कार्यक्रमात कबुल केलं की, ‘ते आंदोलन हे ठाकरे सरकार अडचणीत आणण्यासाठी मला दिलेलं मिशन होतं’ ! अर्थात हे माहिती असूनही त्यावेळच्या सरकारनं भेदरुन आंदोलन चिरडलं नाही.
मग आत्ताचे सत्ताधारी आंदोलनाला एवढे का घाबरतात? रस्त्यात खिळे ठोकून किसान आंदोलन चिरडण्यात आलं. मराठा भावाबहिणींवर लाठीचार्ज करण्यात आला. अहो, छत्रपतींचा पुतळा कोसळला तर साधा एक दिवसाचा ‘महाराष्ट्र बंद’ही करू दिला नाही !
हा कशाचा संकेत आहे?
आपल्या आज्ज्यापणज्यांनी योग्य माणसं सत्तेत आणली, म्हणून आपण पाऊणशे वर्षांपर्यंतचा इथवरचा प्रवास सुखासमाधानात, शांततेत केला. आपल्या बापजाद्यांना घरातल्या नोटा बदलायला उगाचंच कामधंदे सोडून बॅंकांच्या रांगांमध्ये उभं रहावं लागलं नाही… निळू फुलेंनी सरकारविरोधात भाषणं केली म्हणून त्यांना सिनेमातून काढून टाकले नाही… सिनेमात इंदिरा गांधींवर थेट टीका करणार्या दादा कोंडकेंना कुणी ट्रोल केलं नाही की, त्यावेळी काँग्रेस विरोधात झोड उठवणार्या रविशकुमारची आणि निखिल वागळेची नोकरी गेली नाही… कारण त्यावेळच्या सत्ताधार्यांनी जनतेला निषेधाचा असलेला संवैधानिक अधिकार जपला होता.
आपण हा अन्याय सहन करून आपल्या पुढच्या पिढ्या गुलामगिरीच्या जोखडात तर ढकलत नाही ना? याचा विचार करा. अजून तरी होय जागा । तुका म्हणे पुढे दगा ।। बास. एवढेच. जय शिवराय… जय भीम.











