या आठवड्यात 12 डिसेंबर रोजी विवाह नियोजित असलेल्या मुळशी तालुक्यातल्या माण गावातील तरुण पैलवान विक्रम पारखी यांचा जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराने मृत्यू झाला. या घटनेने फक्त पुणे जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात चर्चा सुरू झाली, ती म्हणजे अलीकडच्या काळात तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण जास्त बळावले असून जिममध्ये व्यायाम करणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका का बसत आहे?
मागच्या वर्षी याच तालुक्यातल्या कुस्तीपटू स्वप्नील पाडळे याचा देखील कुस्तीचा सराव करत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. सोलापूरातही एका पोलीस अधिकाऱ्याचा जिम मध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. सप्टेंबर 2024 मध्ये 19 वर्षीय ब्राझिलियन बॉडी बिल्डर मॅच पावलाख याचा देखील फिटनेस जिम मध्ये मृत्यू झाला. हैदराबाद मध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येऊन सिकंदराबाद मधील गौस मंडी भागातील विशाल या हवालदाराचा मृत्यू झाला होता. सन 2022 मध्ये सेलिब्रिटी राजू श्रीवास्तव, सिद्धार्थ शुक्ला आणि सिद्धांत वीर सूर्यवंशी यांच्याही बाबतीत असाच प्रकार घडला.
भारतातील प्रसिद्ध लेप्रोस्कोपिक आणि जनरल सर्जन डॉक्टर अमिता जैन या सांगतात, जे लोक मर्यादेपेक्षा अधिक जोमदार प्रशिक्षण घेतात, त्यांना अनेकदा उच्च रक्तदाबाचा अनुभव येतो. त्यामुळे डाव्या व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी आणि कोरोनरी धमनी रोग त्यामुळे त्यांना होऊ शकतो. रक्तदाबात अचानक वाढ होण्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
जे लोक अचानक व्यायाम शाळेत व्यायाम करण्यास सुरुवात करतात ते आयुष्यभर शारीरिक दृष्ट्या निष्क्रिय असतात, जेव्हा ते अचानक तीव्र कसरत करतात, तेव्हा त्यांचे हृदय संपूर्ण शरीरात रक्ताची वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी संघर्ष करते आणि त्यामुळे रक्तपुरवठा आणि मागणीमध्ये फरक पडून हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.











