मुंबई : महान्यूज लाईव्ह
ऑक्टोबर 2021 मध्ये आयकर विभागाने छापा टाकून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित नातेवाईकांशी संबंधित असलेली व जप्त केलेली 1000 कोटींची संपत्ती दिल्लीच्या बेनामी संपत्ती लवादाने आयकर विभागाचा दावा फेटाळल्याने आता मुक्त झाली आहे. ही संपत्ती आयकर विभाग अजित पवारांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करणार आहे.
आयकर विभागाने ऑक्टोबर 2021 मध्ये छापा टाकला होता. त्यावेळी अजित पवारांच्या नातेवाईकांशी संबंधित असलेली कथित 1000 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील नरिमन पॉईंट मधील निर्मल टावरसह, एक साखर कारखाना, एक रिसॉर्ट जप्त करण्यात आले होते.
याप्रकरणी पवारांच्या नातेवाईकांनी न्यायालयात दाद मागत आम्ही नियमित कर भरतो, कुठलीही कर चुकवेगिरी करत नाही असे स्पष्टीकरण दिले होते. त्याची सुनावणी झाली. त्यामध्ये दिल्लीच्या कोर्टाने पवारांच्या नातेवाईकांचा दावा ग्राह्य धरत आयकर विभागाचे अपील फेटाळले, तसेच संबंधित संपत्ती मुक्त करण्याचे आदेश दिले.











