शिरूर : महान्यूज लाईव्ह
वडगाव रासाई (ता.शिरूर) येथील सगणाई वस्ती येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अखेर बिबट्या जेरबंद झाला आहे. एका महिन्यात दुसऱ्यांदा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
मांडवगण फराटा येथे दोन महिन्यापूर्वी बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर वनविभागाने मांडवगण फराटा वडगाव रासाई परिसरात सुमारे २० हून अधिक ठिकाणी पिंजरे लावले होते. गेल्या आठवड्यात एक बिबट्या वडगाव रासाई हद्दीत पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले होते.
सगणाई वस्ती येथे बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष केंद्रित करत पिंजरा लावण्यात आला होता.या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात दि.६ डिसेंबर रोजी पहाटे बिबट्या भक्ष्य खाण्यासाठी आला असता अलगद जेरबंद झाला.या घटनेची माहिती कळताच तत्काळ वनविभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेत पिंजरा व बिबट्या ताब्यात घेतला. यानंतर सदरील बिबट्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक उपवनसंरक्षक अधिकारी स्मिता राजहंस, वन परिक्षेत्र अधिकारी एस.एस.कंक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भानुदास शिंदे, वनरक्षक शेखर जानगवळी, गोविंद शेलार, शरीफ शेख, सुधीर शितोळे, शरद गदादे, मनोज चौधरी, अमोल पाटोळे, विशाल मोरे यांच्या पथकाने बिबट्या पकडण्यासाठी परिश्रम घेतले.











