नानाची टांग : ज्ञानेश्वर रायते
माहित होतं, कालचा सूर्य आज नाही.. आजचा सूर्य नवा आहे.. नव्याचे नऊ दिवस सुरू झाले.. मुख्य चे उप झाले, उपचे मुख्य झाले.. भावा.. नवे सरकार आले! सोन्याचे दिवस आले.. भविष्य सारे झळालले.. पंधराशे चे धागे आता 21 शे वर गेलेले पाहिले..!
सरकार असतं मायबाप.. गोरगरिबांचा कणा! आम्ही आहोत तुमच्या मागे… महागाईशी फक्त लढ म्हणा! तेल पावणे 200 वर गेले.. गॅसचेही भाव चढले.. आता थोडा फरक पडावा.. भाव थोडा खाली यावा.. कारण नव्याचे नऊ दिवस सुरू झाले.. मुख्यचे उप झाले; उपचे मुख्य झाले! भावा.. आता नवे सरकार आले..!
पेरू पडले.. डाळिंब झडले.. केळीला सुद्धा आलाय ऊत.. शेतकऱ्याच्या हमीभावाचं कधीतरी उतरवा भूत! खाणारी तोंडं जादा म्हणून किती दिस दुःख भोगाव? आलाच आहात नाकावर टिच्चून; तर थोडं तरी सुख द्यावं! माहित आहे आम्हालाही; सरकार म्हणजे नसतं जादूची कांडी! पण कधीतरी आम्हालाही वाटतं, मरणप्राय वाटणारी धोरणं नसावीत बोकांडी! पण आता वाटतंय फार झाले; आता बदलतील दिवस.. का? तर आता देवाभाऊ आले.. भावा.. आता नवे सरकार आले!
आझाद मैदानावरचा झगमगाट आता सामान्यांच्याही नशिबात यावा.. कालचा दिवस असेल कडू; तर आजचा दिवस गोड व्हावा.. बदल्याच्या भावनेपेक्षा बदलाची अपेक्षा आहे.. शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं भलं व्हावं हीच मनीषा आहे.. राजकारण झालं घडीचं, आता तरी समाजकारण व्हावं… बहिणीचे जसे दिवस आले; तसे शेतकरी भावाचं करा चांगभले.. जरी मुख्यचे उप झाले; उपचे मुख्य झाले, तरी नवे सरकार असावे चांगले!
14 ते 19 जिरवण्यात गेले.. 19 ते 24 बुजवण्यात गेले.. 24 ते 29 सुजवण्यात जाऊ नये..न व्हावा जनतेचा भोवरा..जनधनाचा व्हावा औरा.. वाढावा साऱ्यांचा पसारा…! सरकारी कार्यालयात समाधानाचा वसा द्यावा.. काळा पैसा कमी व्हावा.. शेवटी सांगतो सर्वांना वाटावं भले.. अन् माझेच हे सरकार आले..! बाकी सर्वांना चांगल्या कामाच्या शुभेच्छा..!











