इंदापूर : महान्यूज लाईव्ह
नुकत्याच पार पडलेल्या इंदापूर विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पराभूत करत विजयाची हॅट्रिक साधली. आता भरणे यांनी पोलीस संरक्षण स्वीकारण्यास नकार दिला आहे. इंदापूर तालुक्यातील जनता हेच आपले सुरक्षा कवच असल्याचे म्हणत त्यांनी आपल्याला पोलीस संरक्षणाची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आमदार दत्तात्रय भरणे हे 2014 पासून इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. सन 2019 मध्ये ते राज्यमंत्री झाल्यानंतर पोलिसांचा सुरक्षा तापा त्यांच्यासमवेत होता मात्र एरवी सन 2014 पासून ते पोलिसांच्या घराण्यापेक्षा जनतेच्या गराड्यात जास्त वावरतात. आताही आमदार झाल्यानंतर त्यांना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून त्यांना दोन शस्त्रधारी अंगरक्षक पुरवण्यात आले होते. परंतु त्यांनी पोलीस संरक्षण घेण्यास नकार दिला आहे.
याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, संपूर्ण इंदापूर तालुका हेच माझे कुटुंब असून माझ्या कुटुंबामध्ये वावरताना मला कुठल्याही प्रकारच्या सुरक्षेची गरज भासत नाही. तसेच माझी मायबाप जनताच माझे सुरक्षा कवच असल्याचे आमदार भरणे यांनी सांगितले आहे.











