घटना आहे हातकणंगले तालुक्यातील! अंबप गावातील यश किरण दाभाडे या 19 वर्षीय मुलाचा पूर्ववैमनस्यातून तीन तरुणांनी कोयत्याने सपासप वार करत खून केला. डोक्यात तब्बल आठ घाव घातले. ते एवढ्या त्वेषाने घातले की, त्याची कवटी फुटली.
अंबप गावातील यश दाभाडे हा सोमवारी संध्याकाळी अंबप पेटवडगाव रस्त्यावर पाण्याच्या टाकीच्या कठड्यावर काही मुलांसह बसलेला होता. संध्याकाळी सातच्या सुमारास अचानक तिथे दुचाकीवरून तीन तरुण आले. यशचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते. या तिघांनी अत्यंत वेगाने बेसावध असलेल्या यशवर कोयत्याने हल्ला केला. कोयत्याने सपासप वार होत असताना इतर मुले पळून गेली. त्यानंतर हे तिघेही तरुण त्याच दुचाकीवरून हायवेने निघून गेले.
हल्ला प्रेम प्रकरणातून की पूर्ववैमनस्यातून?
दुसरीकडे मिळत असलेल्या माहितीनुसार यश दाभाडे याच्यावर देखील यापूर्वी गुन्हा दाखल होता. एका तरुणावर चाकूने हल्ला केला होता. या प्रकरणी सप्टेंबर 2023 मध्ये पेठवडगाव पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. तो अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. सहा महिन्यापूर्वीच तो गावात परत आला. त्यामुळे आता झालेला हा हल्ला त्याच प्रकरणातून आहे की प्रेमप्रकरणातून? याचा तपास पोलीस करत आहेत.











