दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाईच्या शहाबाग फाट्यावर दोन दुचाकीच्या झालेल्या धडकेत शेंदूरजणे (ता.वाई) येथील प्रतिक राजेंद्र जाधव या २० वर्षाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने शेंदूरजणे गावावर शोककळा पसरली.
प्रतिक हा मंगळवार (दि. 3 रोजी) रात्री सात वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन वाईला जाण्यासाठी घरातून बाहेर पडला. त्याची दुचाकी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास शहाबाग फाट्यावरुन वाई कडे जाणाऱ्या वळणावर आली असता समोरुन भरघाव वेगात आलेल्या दुचाकीने समोरासमोर प्रतिकच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
ही धडक एवढी भीषण होती की, त्यात प्रतिकचा जागीच मृत्यू झाला. प्रतिक हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याच्या या अपघाती निधनानंतर वाई तालुक्यातील शेंदूरजणे गावावर शोककळा पसरली.
शेंदुरजणे (ता.वाई) येथील रहिवाशी राजेंद्र जाधव हे पत्नी उज्वला, मुलगा प्रतिक, मुली सानिका व प्राजक्ता असे जाधव वस्तीवर राहतात. आई वडिलांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत मुलांना शिकवायचे ठरवले आणि प्रतिकला सातारा येथे कॉम्प्युटर सायन्स या उच्च शिक्षणासाठी पाठवला होता. पण काळाने त्याच्यावर झडप घातल्याने आई वडिलांचे व प्रतिकचे उच्चशिक्षणाचे स्वप्न अखेर अधुरेच राहिले.











