शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांच्यावर रविवारी कोयाळी गावठाण येथील हिवरे रस्त्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. यात गंभीर जखमी झालेल्या गिलबिले यांचा रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण शिरूर तालुक्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. अवघ्या बारा तासात पोलिसांनी आरोपीला पकडले.
पप्पू नामदेव गिलबिले असे या आरोपीचे नाव असून या घटनेत दत्तात्रय गिलबिले यांच्या पत्नी रोहिणी दत्तात्रय गिलबिले यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात दत्तात्रय गिलबिले व पप्पू गिलबिले हे शेजारी राहतात. एक वर्षांपूर्वी पप्पू गिलबिले याला दत्तात्रय गिलबिले हे आपल्या पत्नीसोबत चॅटिंग करतात असा संशय होता. त्यावरून त्याने त्यांच्याशी भांडण केले होते, तसेच त्यानंतरही त्यांच्या सतत वाद होत होते.
या घटनेचा पप्पू गिलबिले यांच्या मनात राग होता. रविवारी सकाळी 11:00 वाजता शिक्रापूर गावातील कोयाळी गावठाण हिवरे रस्त्यावरील घरासमोर डिलाईट कॅफेच्या बाहेर दत्तात्रय गिलबिले हे बसले असताना पप्पू गिलबिले याने गळ्यावर, पोटावर व छातीवर धारदार शस्त्राने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्याने दत्तात्रय गिलबिले यांना काहीच सुचू दिले नाही. ही घटना पत्नी रोहिणी गिलबिले यांनी पाहिली आणि त्यांनी नागरिकांच्या मदतीने दत्तात्रय गिलबिले यांना उपचारासाठी दवाखान्यात हलवले, परंतु पुण्यात दवाखान्यात पोहोचेपर्यंत गिलबिले यांचा मृत्यू झाला होता.











