निलेश भोंग : महान्यूज लाईव्ह
संत तुकाराम महाराज राष्ट्रीय पालखी महामार्गाच्या भूसंपादनानंतर रस्त्यामध्ये आडवी आलेली परंतु फक्त काही अंतरच रस्त्यामध्ये जात असूनही संपूर्ण इमारतीलाच पाडावे लागणार असेल, अशा ठिकाणी इमारती मागे घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी बनू लागली आहे.
बारामती तालुक्यातील काटेवाडी नजीकच्या मासाळवाडी भागात तांबोळी कुटुंबाने हरियाणा राज्यातील ठेकेदारांना बोलावून आपली इमारत मागे घेतली. ही इमारत यशस्वीरित्या आता उभी आहे. त्यानंतर इंदापूर तालुक्यातही याच पालखी महामार्गावर आणखी एक इमारत अशा स्वरूपात मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
तब्बल पावणेचार गुंठ्यातील निमगाव केतकी परिसरातील एक इमारत जवळपास 75 फूट बाजूला नेऊन ठेवण्याचा प्रयोग सध्या इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे सुरू आहे. निमगाव केतकी येथील येथील संजय म्हेत्रे त्यांची ही इमारत 75 फूट बाजूला उचलून नेली जाणार आहे त्यासाठी हरियाणा मधील पानिपत येथील ठेकेदार मोहनलाल दरसाल यांनी 16 लाख रुपयांची खर्चाची मागणी केली आहे ही तीन मजली इमारत तीन महिन्यांमध्ये 75 फूट लांब नेली जाणार आहे.
यासाठी 50 कामगार गेल्या काही दिवसांपासून झटत असून चार फूट उंच उचलून जॅकच्या साह्याने इमारत मागील दोन महिन्यांमध्ये 30 फूट बाजूला हलविण्यात आली आहे. 16 लाखांच्या बदल्यात आपली संपूर्ण इमारत व्यवस्थित रित्या आहे तशी सुस्थितीत राहत असेल तर काय हरकत आहे? असाच प्रश्न अनेक घरमालक स्वतःला करू शकतात.











