उसानं समृध्दी आणलेल्या बारामती, इंदापूरात तसं सत्तरेक दिवसांपूर्वीचं वातावरण शांत व प्रसन्न होतं..अगदीच बारमाही जिरायती भागातही असलीच तर पाण्याची ददात, बाकी सगळं जनजीवन सामान्यच…म्हणजे कोल्हापूर, सांगलीला पूर आला, एवढेच नाही, तर निरा-भिमेकाठीही पूर आला….कोठे भूकंप झाला..कोणता एखादा भाग एखाद्या विषाणूला बळी पडला वगैरे…वगैरे. पण तशी कोणतीच भीती आम्हाला काही वाटतच नव्हती…आम्ही तसे त्या बाबतीत नशीबवानच होतो…पण गेल्या सत्तर दिवसांत या दोन तालुक्यांचं जंगल करून ठेवलं बिबट्या आणि लांडग्या, तरसांनी!
अंधारबन मध्येही उन्हाळ्याच्या कडक उन्हात चार वाजता अंधार नक्कीच पडत नाही…आमच्याकडे मात्र चार, साडेचारलाच रस्ते ओस पडतात…मजूर घरात बसतात आणि शेतकऱ्याची दारं, कवाडं लावली जातात…बारामती, इंदापूर तालुका हा काय जंगलाचा भाग आहे का? नक्कीच नाही. चांगले उद्योग आहेत. शेती समृध्द आहे. हजारो एकराच्या फळबागा आहेत. जोडीला अनेकजण लखपती, करोडपती आहेत. पण तरी देखील दिवसा फिरायला भीती वाटावी असं वातावरण सध्या आहे आणि एखादी लाट यावी तसे एका भागात बिबट्या असला तरी अनेक गावांमध्ये एकाच रात्रीत जनावरे मारलेल्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. म्हणजे एखादी लाट यावी तशीच बिबट्यांची देखील फौज दोन तालुक्यात आलेली असावी आणि गावागावात बिबट्यांनी आपापली सत्ता वाटून घेतली असावी असाही एक समज (गैर) लोकांमध्ये पसरून भीती दाटू लागली आहे.
थोडक्यात कन्हेरीत बिबट्या सापळ्यात अडकला, तर दोन तासांत बिबट्याची बायको तिकडे लाकडीत दिसली…त्यांची पोरं देखील कोणालातरी दिसली. संध्याकाळी तर इंदापूर- बारामती रस्ता ओलांडून ढेकळवाडी, सोनगावच्या हद्दीत बोकडाला मारल्याची घटना घडली. ती संपत नाही, तोच दहा किलोमीटरवरच्या बेलवाडीत शेळी खाऊन रस्त्यावर टाकली. त्याच रात्री बिबट्या सणसरमध्ये सरपंचांच्या शेतात दिसला. त्याने गुरगुरण्याचा आवाज काढला आणि भवानीनगरचा भरला बाजार संध्याकाळी शांत झाला. नेमके बिबटे आहेत तरी किती? आणि एका रात्रीत किंवा दिवसभरात फिरतात तरी किती हा प्रश्न मात्र आता हजारोंच्या डोक्यात कायमचा घर करून बसला आहे.
हे बिबट्याचे विडंबन नाही. मात्र बिबट्या या भागात आलेच कसे हा प्रश्न मात्र सर्वांनाच सतावत आहे. त्यातच बिबट्याला कोठेही नेऊन सोडले, तरी तो हा रस्ता, हा भाग विसरणार नाही, तो पुन्हा येथे येऊ शकतो हे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याने तर ही भीती जास्तच मनात घर करून बसली आहे. वास्तविक पाहता बिबट्या, वाघांचे सुरक्षित कॉरिडॉर असतात. मग बारामती, इंदापूर हे काही बिबट्यांचे माहेरघर कसे असू शकते हा प्रश्न काही चुकीचा नाही. मात्र गेली अनेक वर्षे आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यांमध्ये बिबट्यांनी उसाची शेतीलाच आपलं जंगल मानलं आणि परिणामी जिथे जिथे उसाची शेती, तिथे तिथे बिबटे दिसू लागले. फक्त आता ते इंदापूर, बारामतीत दिसू लागले, त्यामुळे काळजी जास्त वाटू लागली आहे. डोंगरांच्या कडेला कोरून घरे बांधणाऱ्यांच्या संख्या जसजशी वाढत चालली आहे, तसतसे तिथे असुरक्षित वाटू लागलेल्या वन्यप्राण्यांनी आपले जंगल मानवी वस्तीत उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळेच कधी न दिसलेले, कधी न हल्ला केलेले तरस, लांडगे, कोल्ह्यांपासून ते बिबट्यांपर्यंतचे प्राणी आता माणसांच्या जंगलात शिरून मानवी वस्तीला आपले जंगल समजू लागलेत. त्यांच्या आणि माणसांच्या संघर्षात ते माणसांना नक्कीच पुरून उरतील..तेव्हा बिबट्यांपासून सुरक्षा करण्याची साधने कायम जवळ बाळगावी लागतील अशी स्थिती आताच निर्माण झाली आहे, ती कायमची, सर्रास गरजेची आणि अत्यावश्यक बनतील, तेव्हा आता ज्या दररोज, तासातासाला बिबट्यांच्या बातम्या येतात, त्या येणार नाहीत…!










