मुंबई : महान्यूज लाईव्ह
आत्ता झाला झाला म्हणता, अजूनही भाजपचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरेना! देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार अशी सुरवातीची चर्चा आता पुन्हा विनोद तावडेंपासून मुरलीधर मोहोळ ते आता रवींद्र चव्हाणांपर्यंत पोचली आहे. अजून भाजपचे कोणते कोणते मोहरे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आणले जातात याकडे आता भाजपचेच आमदार संशयाने पाहू लागले आहेत.
भाजपचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी निश्चित झाला आहे. 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा शपथविधी होणार आहे. मात्र अजूनही मुख्यमंत्री कोण हे निश्चित झाले नाही. गृहमंत्री अमित शहा यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवारांना पाचही वर्ष भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे स्पष्ट केले आहे, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर 178 आमदारांनी शिक्कामोर्तब केले होते. मात्र अचानक विनोद तावडे यांचा ट्विस्ट निर्माण झाला.
राज्यात सध्याच्या राजकीय स्थितीमध्ये मराठाच मुख्यमंत्री पाहिजे अन्यथा देवेंद्र फडणवीस यांना मोठा विरोध होऊ शकतो आणि भाजपची मोठी पिछेहाट होऊ शकते असे विनोद तावडे यांनी भाजपच्या वरिष्ठांच्या नजरेस आणून दिले आणि त्यानंतर पुन्हा नव्या नावांचा शोध सुरू झाला. मग सुरुवातीला तावडे, त्यानंतर मुरलीधर मोहोळ त्यानंतर आता रवींद्र चव्हाण अशी एक एक नावे पुढे येऊ लागली आहेत. अर्थात भाजप खरंच धक्कातंत्र वापरणार की, देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामार्फत करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.











