विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
26 नोव्हेंबर चा दिवस… दुपारच्या बारा वाजता बारामती तालुक्यातील अंजनगावात किराणा दुकानातून दोन रुपयांचा खाऊ आणतो असे सांगून तिसरीत शिकणारा श्रेयस घरातून गेला. बराच वेळ घरात आला नाही, म्हणून त्याच्या आईने बहिणीने व नातेवाईकांनी गावात शोध घेतला, तरीही तो आढळून आला नाही, म्हणून थेट माळेगावचे पोलीस ठाणे गाठले.
माळेगाव पोलीस ठाण्यात श्रेयसच्या आईने अज्ञात व्यक्तीने आपल्या मुलाचे अपहरण केल्याची फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत माळेगाव पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला. सहायक निरीक्षक सचिन लोखंडे यांनी वरिष्ठांना तातडीने या संदर्भातील माहिती दिली आणि फौजदार अमोल खटावकर व सहकाऱ्यांसमवेत अंजनगावसह आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपसायला सुरुवात केली.
अपहृत मुलगा श्रेयस याचा शोध घेण्यासाठी चार वेगवेगळी तपास पथके तयार करून श्रेयस याचा शोध घेण्यासाठी घटनास्थळाच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही व गोपनीय माहितीच्या आधारे तपासाला सुरुवात केली. दरम्यान हा श्रेयस बारामती तालुक्यातील पणदरे परिसरात पोलिसांना मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन आई-वडिलांच्या ताब्यात सुखरूप पोलिसांनी दिले. अर्थात अद्याप पोलिसांनी नेमके काय झाले होते याची माहिती दिलेली नाही.
दरम्यान ही कामगिरी अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, देविदास साळवे, तुषार भोर, पोलीस अंमलदार विजय वाघमोडे, राहुल पांढरे, ज्ञानेश्वर मोरे, अमोल वाघमारे, अमोल राऊत, नितीन कांबळे, गणेश खंडागळे, नंदकुमार गव्हाणे, धीरज कांबळे, महिला पोलीस अंमलदार सुनिता पाटील यांनी केली.











