काका यादव : महान्यूज लाईव्ह
कानून के हात कितने लंबे होते है? म्हणजे अगदी पुरावा नसला तरी खबऱ्यांच्या माध्यमातून पोलीस आरोपी पर्यंत पोहोचतात.. पण तरीसुद्धा पोलिसांना काहीतरी सुगावा लागतोच लागतो.. इंदापूर तालुक्यात अशीच एक घटना घडली असून फक्त लाकडावरून पोलिसांनी आरोपी शोधले आणि मयतही शोधला! फक्त लाकडावरून वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक आणि पुण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक मोठा गुन्हा उघडकीस आणताना पोलिसांचे डोळे अजूनही तेवढेच तेज असल्याचे दाखवून दिले.
या घटनेची माहिती देण्यासाठी खुद्द पोलीस अधीक्षक पंकज देशमुख हे वालचंदनगरला आले होते. आता ही घटना काय ते पाहू. 16 नोव्हेंबर 2024 सकाळी साडेनऊ वाजले.. इंदापूर तालुक्यातील तावशीच्या स्मशानभूमी मध्ये प्रेत जळत आहे आणि त्याच्या कडेला रक्त पडलेले आहे असे काहींनी पाहिले.. गाव एवढेही काही मोठे नाही की, गावात गेलेल्या माणसाची खबरबात इतरांना कोणाला नसावी.. साहजिकच थोडावेळ लोकांनी आपल्या गावात रात्री कोण गेलं याची चौकशी करायला सुरुवात केली. परंतु गावातील कोणीच त्यादिवशी ईहलोकीचा प्रवास संपवलेलं नव्हतं.
मग शेजारी पडलेल्या रक्तामुळे लोकांना संशय आला. त्यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना आणि तावशीच्या पोलीस पाटलांना माहिती दिली. वालचंदनगरचे सहाय्यक निरीक्षक राजकुमार डुणगे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह तेथील घटनास्थळी आले. त्यांनी पाहणी केली. तेव्हा स्मशानभूमीच्या लोखंडी जाळीवर जळालेली हाडे आणि तेथून काही अंतरावर 40 फुटावर रक्त सांडलेले दिसले. या लोखंडी जाळीच्या बाजूला अर्धवट जाळलेली लाकडे दिसत होती, परंतु तिथे काय जळले आहे याची काहीच माहिती मिळत नव्हती.
मग पोलिसांनी प्राथमिकदृष्ट्या हा घातपाताचा प्रकार दिसून येत असल्याचा निष्कर्ष नोंदवला. स्टेशन डायरीत नोंद केली आणि या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांना दिली आणि त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार वालचंदरच्या पोलीस ठाण्याचे पथक आणि पुण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आसपासच्या लाकडांच्या वखारीवरती तपास करू लागले.
दरम्यानच्या काळात फलटण तालुक्यातील गुणवरे या गावातील एका वखारीमधील ही लाकडे असल्याची गोपनीय माहिती दोन दिवसानंतर पोलिसांना मिळाली. त्यामुळे 18 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. तेव्हा या वखारीतून दादासाहेब मारुती हरिहर (वय 30 वर्ष रा. गोखळी ता. फलटण जि. सातारा) व त्याचा मित्र विशाल सदाशिव खिलारे या दोघांनीही लाकडी खरेदी केली होती व मृताच्या अंत्यविधीसाठी वाहनांमधून गेले होते अशी माहिती वखारमालकाने दिली.
मग पोलिसांनी दोघांचा शोध घेतला आणि ताब्यात घेतले, तेव्हा गंगाखेड या परभणी जिल्ह्यातील राहणाऱ्या हरिभाऊ धुराजी जगताप या 74 वर्षीय व्यक्तीचा तो मृतदेह असल्याचे व त्यालाच पेटवून दिल्याचे या दोघांनी सांगितले. पोलिसांनी या संदर्भात कारण विचारले असता, दादासाहेब मारुती हरिहर याच्या बायकोवर वाईट नजर असल्याच्या कारणावरून दोघांनी कट रचला. 15 नोव्हेंबर रोजी जगताप यास जेवण करण्याच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील टाकेवाडी येथील यात्रेला नेले व येताना तावशी येथे स्मशानभूमी जवळ लघुशंकेसाठी म्हणून गाडी थांबवली व त्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यास जीवे मारले. व स्मशानभूमीतच पेटवून दिले.
दरम्यान या घटने संदर्भात मयत हरिभाऊ जगताप यांचा नातेवाईक सचिन हरिभाऊ जगताप रा. कोल्हापूर यांनी फिर्यादी दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला व दोघांना अटक केली. दोघांनाही 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. दरम्यान ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वालचंदनगरचे सहाय्यक निरीक्षक राजकुमार डूणगे, कुलदीप संकपाळ, बाळासाहेब कारंडे, शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, गणेश काटकर, अजित थोरात, स्वप्नील अहिवळे, अजय घुले, निलेश शिंदे, विक्रमसिंह जाधव, अभिजीत कळसकर यांच्या पथकाने केली.











