विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होत आहे. शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे. युगेंद्र पवार
यांच्या प्रचारानिमित्त शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. आज बारामतीतील ग्रामीण भागात शरद पवार यांनी शिर्सुफळ, मोरगाव, सुपा या ठिकाणी सभा घेतल्यानंतर सोमेश्वरनगर करंजेपुल या ठिकाणी सभा झाली.
यावेळी सोमेश्वरनगर येथील सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, मला चिठ्ठी आली की कारखान्याचे चेअरमन, संचालक, पतसंस्थाचालक आणि बाकीचे लोक मतदारांना दम देतात. कामगारांना सांगतात की नोकरीवरून काढू, धमकी देतात. माझी विनंती आहे जे कोणी संचालक असतील आणि चेअरमन असतील व्हा.चेअरमन असतील या कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी माझ्याकडे ५० वेळा आले.
अनेकदा आले, मी पक्ष बघत नाही. मी जात बघत नाही. त्यांची जात माझ्या दृष्टीने एकच, शेतकरी! कुठलाही साखर कारखाना आणि कुठलीही सहकारी संस्था अडचणीत आल्यानंतर माझ्या हातात सत्ता होती तोपर्यंत मी पक्ष बघितला नाही. मी त्याचं काही बघितलं नाही. त्यांना सरसकट मदत केली. त्याला तुमचा कारखाना सुद्धा अपवाद नाही. आणि असं वागल्यानंतर तुमच्या सभासदांना तुमच्याच कामगारांना तुम्ही दम देताय? का दम देताय? आता कोणी दम दिला तर मला कळवा. मी येतो तुमच्याबरोबर त्याच्या घरी येतो.. शरद पवारांनी असा इशारा दिल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाटच केला.
पुढे बोलताना पवार म्हणाले, कोण चेअरमन असू दे किंवा कोणी असू दे. आम्ही कधी चुकीचे रस्त्याला जात नाही. पण लोकशाहीमध्ये मत द्यायचा, प्रचार करायचा हा तुमचा हे अधिकार आहे. माझाही अधिकार आहे. मी सकाळीच सांगितल, एका चेअरमनला; पण तुमच्या नाही. दुसऱ्या चेअरमनला. त्यांनीही कामगारांना दम दिला की, नोकरीवरून काढून टाकणार. मग मी त्यांना फोन केला, लोकशाहीमध्ये कोणाला मत द्यायचं, प्रचार करायचा हा त्याचा अधिकार आहे.
लोकांना तुम्ही दमदाटी करायला लागला, तर हे सहन केलं जाणार नाही. ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी. त्यामुळे तुम्ही भानगडीत पडू नका आणि पुन्हा माझ्या कानावर जर बाब आली तर मी आहेच या ठिकाणी! तुम्ही काळजी करू नका. मला या रस्त्याने जायचं नाही. माणसं आपली आहेत. माणसं चुकली असतील. कुणीतरी त्यांनाच दम दिला असेल. त्याच्यामुळे कदाचित त्यांनी हे केलं असेल. त्यांच्यामुळे माझं सांगणं आहे. आपल्या भागात आपण कधीही हे केलं नाही. ते करू नका. विरोधासाठी विरोध करायचा असेल तर विरोध करा. तुमचा अधिकार आहे, पण विरोध याचा अर्थ दुसऱ्याच्या मत स्वातंत्र्यावर गदा आणायचा अधिकार तुमचा नाही. कायद्याने तुमच्या सगळ्यांचे अधिकार सारखे आहेत. ही लोकशाही आहे आणि म्हणून त्या लोकशाहीच्या विरुद्ध कोणीही जाऊ नये, एवढच माझं सांगणं आहे. असेही शरद पवार म्हणाले.











