दौंड, महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्हयामध्ये वास्तव्यास असणा-या तृतीयपंथीय (पारलिंगी) नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागृती व्हावी, त्यांनाही संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावता यावा, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी पुणे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, पुणे समाज कल्याण विभाग आणि सावली सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक आयोगाने केले आहे. कोणताही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये याची दक्षता निवडणूक विभाग घेत आहे. पारलिंगी (तृतीयपंथीय ) व्यक्तींना मतदार कार्ड व त्याचे महत्व याविषयाबाबत माहिती देऊन सर्वसामान्य स्त्री-पुरुषांप्रमाणे तुम्हीही या देशाचे समान नागरिक असल्याने तुम्ही देखील मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन तुमचा मतदानाचा हक्क बजावू शकता व या देशाचे सुजान नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडू शकता.
त्यामुळे तुम्ही स्वतः व तुमच्या ओळखीच्या पारलिंगी (Transgender) व्यक्तींनी मोठ्या संख्येने या अभियानामध्ये सहभाग घेऊन येणा-या विधानसभा निवडणुकीमध्ये आपले अमुल्य मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. समाजातील नेहमी दुर्लक्षित असलेला तृतीयपंथीय नागरिक मतदानापासुन वंचित राहिला आहे. त्यांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पुणे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कुमार पिनेकल हाऊसिंग सोसायटी, ताडीवाला रोड, पुणे स्टेशन जवळ, पंचशिल चौक पासून ते भाजी मार्केट सिध्देश्वर मंडई चौक प्रायव्हेट रोड या मार्गावर मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.
या प्रसंगी समाज कल्याण कार्यालय गृहप्रमख नंदकुमार राणे, तृतीयपंथी समाजसेविका व सावली सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. आम्रपाली मोहिते तसेच किरण पवार, राणी शेख, माही माने, नंदिनी, पारलिंगी सदस्य मंगल गायकवाड, जयश्री यादव, प्रिया ताई आदींसह वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.











