दौंडमध्ये अजित पवार गटाचे वीरधवल जगदाळे, राजाभाऊ तांबे, बादशाह शेख, वसंत सांळुखे यांची रिंगणातून माघार!
राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वीरधवल जगदाळे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बादशाह शेख, मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक राजाराम तांबे आणि वसंत साळुंखे यांनी आपले उमेदवारी अर्ज घेतले. त्यामुळे भाजपचे उमेदवार राहुल कुल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रमेश थोरात यांची थेट आणि सरळ लढत होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अर्ज मागे घेण्याची सोमवारी (दि. ४ ) शेवटची तारीख होती. त्यामुळे कोण कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. दौंड विधानसभेसाठी २३ उमेदवारांनी आपले उमेदवार अर्ज दाखल केले होते.
छाननीत तीन अर्ज अवैध झाल्याने २० उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरले होते. सोमवारी (दि ४) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक आणि दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बादशाह शेख, मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक राजाराम तांबे आणि वसंत साळुंखे, आरपीआय (ए) चे संदीप आढाव यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तसेच सुमन मस्के या अपक्ष असे सहा उमेदवारांनी आपले उमेदवार अर्ज मागे घेतले.
आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात १४ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, भाजपचे उमेदवार राहुल कुल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रमेश थोरात या दोघांमध्ये तर सरळ लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले. भाजपचे उमेदवार राहुल कुल यांनी अजित पवार गटाचे उमेदवार वीरधवल जगदाळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीने आघाडी धर्म पाळल्याने समाधान व्यक्त करत महायुती भक्कम झाली असुन महायुतीचे नेते अजित पवार व महायुतीतील प्रमुख नेत्याचे आभार मानले आहेत.











