इंदापूर : महान्यूज लाईव्ह
निवडणुकीच्या काळात प्रतिस्पर्धी उमेदवाराची मते कमी व्हावीत यासाठी देखील राजकारण खेळले जाते. लोकसभेच्या निवडणुकीत तुतारी वाजवणाऱ्या माणूस या चिन्हाचा प्रभाव ट्रंपेट ने कमी केला होता. एकाच आडनावाचे किंवा नावाचे उमेदवार उभे करण्याकडे देखील प्रतिस्पर्धी उमेदवारांचा कल असतो. इंदापुरातही तसेच झाले आहे. इंदापुरात प्रमुख उमेदवारांमध्ये विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना घड्याळ, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना तुतारी वाजवणारा माणूस तर प्रवीण माने यांना किटली हे चिन्ह मिळाले आहे.
इंदापूरच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 24 उमेदवारी अर्ज निवडणूक रिंगणात राहिले आहेत. यामध्ये प्रमुख उमेदवारांमध्ये दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांचा समावेश आहे. आता याच यादीमध्ये दोन हर्षवर्धन पाटील आणि दोन दत्तात्रय भरणे निवडणूक रिंगणात आहेत.
विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील दत्तात्रय सोनबा भरणे यांनी देखील उमेदवारी अर्ज इंदापूर तालुक्यातून भरला असून त्यांना अंगठी हे चिन्ह मिळाले आहे. दुसरीकडे दोन हर्षवर्धन पाटील या निवडणूक रिंगणात असून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह, तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एकशिव गावचे हर्षवर्धन गोपाळराव पाटील यांनीही इंदापूर तालुक्यातून अर्ज भरला असून त्यांना हेल्मेट हे चिन्ह मिळाले आहे.
योगायोगाची बाब अशी की, शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष असलेले पांडुरंग रायते यांना शेतकरी संघटनेला अभिप्रेत असलेलेच ऊस घेतलेला शेतकरी असे चिन्ह मिळाले आहे. तर दुसरीकडे तुतारी व ट्रंपेट यांचा सामना लोकसभेत झाला होता. आता राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे चित्र राज्यभरात असल्याने बोरी गावचे गिरीश मदन पाटील यांनी महाराष्ट्र विकास आघाडी असे नाव घेऊन ट्रंपेट हे चिन्ह मिळवले आहे.











